हिमायतनगर/हदगाव/नांदेड,अनिल मादसवार। अवघ्या दोन आठवड्यावर खरीप हंगाम येऊन ठेपला आहे, त्यामुळे शेतकरी राजा पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपुन बाजारपेठ ठेत पेरणीसाठी लागणारे बि बियाणे खरेदीसाठी दाखल होत आहेत, मात्र खरीप हगांमासाठी लागणारे बी बियाणे जादा दराने विक्री करून, व निकृष्ठ दर्जाचे बियाने व खते शेतकऱ्यांच्या माथी मारून काही कृषी विक्रेते मालामाल होऊ पाहत आहेत, हा प्रकार लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व जादा दराने व बोगस बियाण्याची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कार्यवाही करावी अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
आगामी सण 2024-25 च्या खरीप हगांमासाठी पेरणीपूर्वी ची पूर्ण तयारी झाल्यानंतर शेतकरी बांधवाकडून बी बियाणे व खते खरेदी करणे सुरु झाले आहे. हदगाव व हिमायतनगर तालुक्यात जादा दराने जादा दराने बी बियाणे व निकृष्ठ दर्जाचे बियाने विक्री होत असल्याचे शेतकरी बांधवाच्या तक्रारी येत आहेत. अगोदरच शेतकरी ओला व कोरडा दुष्काळ आणि सततच्या नापीकीमुळे व कृषी मालास योग्य बाजार भाव मिळत नसल्यामुळे अडचणीत आलेला आहे. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा वाढतंच असून, येणाऱ्या हंगामात चांगलं उत्पन्न मिळवुन कर्जमुक्त होऊ आणि मुला बाळांच शिक्षण व लेकी बळींची जबाबदारी थाटात लग्न करून पार पाडू या आशेने शेतात घाम गाळून पेरणीच्या अंतिम तयारीला लागले आहेत.
मात्र शेतकऱ्यांच्या याच अडचणींचा फायदा घेऊन हदगाव हिमायतनगर तालुक्यातील काही कृषी दुकानदार शेतकरी बांधवाना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बी बियाने व खते योग्य भावात न देता त्यांची जादा दराने विक्री करून लूट करण्याच्या उद्देशाने वेठीस धरत आहेत. अश्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत, खरं पाहता शेतकऱ्यांना रास्त भावात कृषी निविष्ठा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी हदगाव व हिमायतनगर तालुक्यात जादा दराने बी बियाणे व निकृष्ठ दर्जाचे बियाने व खते विक्री करणारे केंद्र चालकावर भारारी पथक नेमणुक करुन कार्यवाही करावी व तसेच शेतकऱ्याना कुठल्याही कंपनीचा माल घेतलाच पाहीजे अशी अट कृषी केंद्रचालकाकडून होणार नाही. यासाठी त्याना आदेश देण्यात यावे. जेणेकरून कर्जबाजारी होऊ लागलेल्या शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याची मुभा मिळेल व उराशी बाळगून असलेली स्वप्न साकार करण्यासाठी मदत मिळेल. असेही नेहमी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा करताना म्हंटले आहे. आमदार जवळगावकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवाकडून आभार मानले जात आहे.
जागरूक नागरिक, पत्रकार व पंचासमक्ष कृषी दुकानातील कारभाराची चौकशी व्हायला हवी
मागील अनेक वर्षांपासून हिमायतनगर हदगाव तालुक्यातील काही कृषी दुकानदारांकडून सर्रास लूट केली जाते, हे सर्वश्रुत आहे, असे असताना देखील कृषी विभागाकडून नेमण्यात आलेल्या भरारी पथक कुठं भरारी मारते हे अद्याप कळुन आले, नाही या पथकाच्या निष्क्रियतेच्या अथवा लालची वृत्तीमुळे कृषी दुकानदार शेतकऱ्यांची दिवसा ढवळ्या लूट करून वेठीस धरतात असे म्हंटल्यावर वावगे ठरणार नाही. ही बाब लक्षात घेता केवळ कागदावर भरारी पथक न राहता प्रत्यक्ष सर्वसामान्य शेतकरी व जागरूक नागरिक आणि पत्रकार व पंचासमक्ष कृषी दुकानातील कारभाराची चौकशी करायला हवी तरच शेतकऱ्यांची होणारी लूट थांबण्यास मदत मिळेल असे कृषी दुकानदाराच्या मनमाणीमुळे अडचणीत आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांसह अनेक जाणकारांचे मत आहे.