
नांदेड| यावर्षी कडक उन्हाळा असून पाळीव प्राण्याबद्दल विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषत: विटभट्यावर काम करणारे गाढव, घोडा व खच्चर यांना अधिक वजन व भर उन्हात काम न देण्याचे तसेच दर दोन तासांनी उन्हामध्ये पाणी देण्याबाबत पशुसंवर्धन विभागाने सर्व विटभट्या मालकांना तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहकांना आवाहन केले आहे.
मुक्या जनावरांना काय त्रास होतो हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कोणतीही क्रुरता होवू नये यांची काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय जीवजंतु कल्याण बोर्ड या संस्थेने वीट भट्यावर काम करणाऱ्या गाढव, घोडा व खच्चर या प्राण्यासाठी मार्गदर्शीका निर्गमित केली आहे. तसेच प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा सन 1960 यामध्ये देखील यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून ज्या ठिकाणी तापमान 37 अंशापेक्षा अधिक आहे. त्याठिकाणी 12 ते 3 या वेळेत गाढवांना व अन्य प्राण्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. उष्ण हवामानात काम केल्याने मानवाप्रमाणे शरीरातील पाणी कमी होणे, उष्णतेचा ताण, पाठदुखी या समस्या गाढवांमध्ये अभ्यासाअंती दिसून आले आहे.
71 टक्के प्राणी उन्हाळयामध्ये कमी पाणी पिल्यामुळे आजारी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गाढवांना वारंवार पाणी पाजणे आवश्यक आहे. तसेच काम करताना थोडया थोडया वेळाने त्यांना आराम देणे आवश्यक आहे. सतत 5 तास अधीक काम करुन घेणे निदर्यी वागणूक असून क्रुरतेचे लक्षण आहे.
त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाकडे पशुपालकांनी गाढवांच्या मालकांनी लक्ष वेधावे यासंदर्भात काम करणाऱ्या संघटना तसेच सुशिक्षित तरुणांनी मुक्या जनावरांच्या या समस्याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.
