राजकिय

राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य; महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करु नका – नाना पटोले

अमरावती। नाशिकमधले ड्रगचे लोण अमरावती सारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्विकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब करु नका असे आवाहन करत राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग तस्करी अशक्य आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक अमरावतीमध्ये पार पडली त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, ड्रग माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून फरार करण्यात कोणी मदत केली हे समोर येत आहे. ललित पाटील गायब कसा झाला ? त्याला सोडवण्याचा कोण प्रयत्न करत आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही जाहीर करू परंतु तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोणीही पाठिशी घालू नये. असले प्रकार होऊ नयेत ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. नाशिकमधील ड्रग प्रकरण काही कालचे नाही ते आधीपासूनचे आहे, त्याला कोणा कोणाचा पाठिंबा आहे हे हळूहळू बाहेर येत आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरु असून आज अमरावती विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढत असून जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे याला प्राधान्य दिले जाणार आहे. उदयपूर शिबिरातील निर्णयांची अंमलबजावणी कितीपत झाली याचाही आढावा घेतला जात आहे. जागा वाटपाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाने जागा लढवावी अशी मागणी करत असतात ते योग्यच आहे पण मेरिटनुसार जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळेल यापेक्षा मविआच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या भाजपाला सत्तेबाहेर काढणे हेच आमचे काम आहे.

व्हायब्रंट गुजरातबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहेत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेला लुटले होते पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकार मधले लोक गुजरातचे हस्तक आहेत हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

अमरावतीच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुनिल देशमुख, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आ. बळवंतराव वानखेडे, अमरावती ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलुभाऊ देशमुख, अमरावती शहर काँग्रेस अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, माजी महापौर विलास इंगोले अमरावतीचे प्रभारी नाना गावंडे आदी उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!