बारड/नादेड। एका भरधाव ट्रकने बारड शहरातील मुख्य चौकात उभ्या असलेल्या 8 दुचाकींना जबर धडक देऊन चिरडले आहे. त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, काही जण जखमी असल्याचे सांगितले जाते आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर व्रत असे की, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर बारड येथिल चौकाच्या रस्ताकडेला दुचाक्या व बाजूला काही नागरीक उभे होते. दरम्यान मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने ट्रक क्रमांक एम.एच.34 बी.जी. 7423 च्या मालवाहू चालकाने दुचाकी गाड्यांना जबर धडक दिली. त्यात गोविंद रामजी कोडेवाड (40) रा. खरबी ता. भोकर यांना गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच ईतर काहींना मार लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच बारड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतूक पोलिसांनी देखील भेट देऊन रस्त्यावरील ट्रक व वाहने दूर करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात दुचाक्यांचा चकनाचूर झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

