नांदेड| जिल्ह्यातील बेरोजगार युवतींना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन आज 17 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे प्रकाश निहलानी यांनी युवतींना करिअर विषयक मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. एकूण 13 कंपन्यांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये एकुण 379 महिलांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 273 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड तर 98 महिला उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी सतीश चव्हाण, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे प्रतिनिधी विशाल चव्हाण, स्वाती तुपेकर, शिवाजी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती स्मिता नायर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.