सरसकट गरजवंत मराठ्यांसाठी सरसकट मराठा लोक प्रतिनिधीनी मनोज जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे पणे ऊभे राहावे..!- डॉ.हंसराज वेद्य

नांदेड| आज मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात ऐरणीवर आलेला आहे. जरांगे पाटलांचा हा लढा सर्व सामान्य, गरजवंत मराठ्यासाठीचा न्याय लढा आहे. हा लढा एकट्या जरांगे पाटलांचा वैयक्तिक नाही. कौटुंबिक नाही. जरांगे पाटलांच्या कुटुंबातील प्रत्येक घटक समाजासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसत आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील जिवाची बाजी लावताना दिसत आहेत. सरकारने एकाला जरी अटक केली तरी सर्व मराठा बांधवानी कशाचीहि तमा, लालसा तथा भिती न बाळगता एकजूटीने तुरूंगात जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
हवे असलेले, हवे तेवढे, हवे तसे पुरावे मिळालेले आहेत. आयोगाचा अहवालही उपलब्ध आहे. हवा तेवढा शासनाला वेळ देऊनही शासन निर्णय का घेत नाही? सरकारलाच नव्हे, शासनातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील सर्वच मराठा प्रतीनिधींना भानावर येण्याचे आवाहन करत असताना दिसत आहेत. पण महाराष्ट्रातले (क्वचित अपवाद सोडले तर) आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, तोंडं उघडायला तयार नाहीत..! काहीजण हलक्या आवाजात मिळायला हवे आहे असे म्हणताना दिसत आहेत.
ज्या ओबीसींच्या नेत्यांना मराठा नेत्यांनीच आपल्या पक्षातून मोठं केलेले आहे, तेच ओबीसी नेते मराठा आरक्षणालाच प्रखर विरोध करताना दिसत आहेत. वाट्टेल तसे, पातळी सोडून बरळत आहेत. तरीही पक्षातील आमदार, मंत्री, खासदार ते खूशाल ऐकून घेत आहेत.! त्यांना गप्प का करत नाहीत? जाती जातीत कलह निर्माण केला जात असताना ही मंडळी अशी का वागत आहेत? जरांगे पाटील चूकीचं बोलत आहेत का? गरजवंत मराठ्यांची दिशाभूल करत आहेत का? गरजवंत मराठ्याना आरक्षण मिळणे गैर आहे का? अशी शंका तथा भावना सामान्य जनतेची व्हावी म्हणून तर असे वागत नाहित ना अशी शंका येण्यास वाव आहे?
खरं तर आज शासनातील व विरोधी पक्षातील सर्वच आजी माजी मराठा लोक प्रतिनिधीनी एकोप्यानी गरजवंत समाज बांधवासाठी आपापल्या परिने आपल्या पदाचे राजीनामे देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे ऊभे राहिले पाहिजे. शासनावर दबाव आणला पाहिजे. बघ्याची भूमिका घेण्याची ही वेळ नाही आहे. ही काळाची गरज आहे असे वाटते, असे डॉ.हंसराज वैद्य यांनी आवाहन केले आहे.
