“उदे ग अंबे उदे”च्या जयघोषात माहूर गडावर रेणुका मातेची झाली थाटात घटस्थापना
नांदेड/माहूर। साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील माता श्री रेणुका मंदिरात अश्विनशुध्द प्रतिपदेला म्हणजे रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी मोठ्या हर्षोल्हासात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सपत्नीक अभिषेक व महाआरती केली. यावेळी “उदे ग अंबे उदे”च्या जयघोष करण्यात आला.
या शुभ प्रसंगी रेणुका देवी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सहपरिवार उपस्थिती दर्शविली होती. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सकाळी नऊ वाजता माता श्री रेणुका देवी मंदिरात घटस्थापने निमित्ताने विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब शिनगारे यांनी सपत्नीक उपस्थिती लावली होती. श्री रेणुका देवी मंदिराच्या समोर कुमारिका पूजन व सुहासिनी पूजन अध्यक्ष/ सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल्यानंतर दुपारी बारा वाजता घटस्थापनेची महाआरती करण्यात आली.
यावेळी रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कानव, आशिष जोशी, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.