नांदेड,अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध दरासाठी दि.१४ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार गाईच्या दुधाला ३.५/८.५ नुसार किमान दर ३४ रूपे प्रति लिटर जाहीर केला होता, या दरात रिव्हर्स दराची तरतूद केल्यानंतर सुद्धा हा दर विविध दूध संघाकडून ३४ ऐवजी २७ पर्यंत खाली आणण्यात आला.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचे हाक दिल्यानंतर दि.२१ नोव्हेंबर रोजी मुंबई सह्याद्री अतिथीग्रहावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलवली होती. रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि विविध संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी आणि दूध संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक झाली पण बैठक निष्फळ झाली. यात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही ,त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याची लूट होत आहे त्यामुळे आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दूध संकलन केंद्र ,नांदेड येथे या शासन निर्णयाची होळी करण्यात आली व राज्य सरकारच्या आणि दूध संघाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी विनोद वंजारे (जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना), उत्तम पाटील धामणगावकर (जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती पक्ष), बालाजी पांचाळ (जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल ), राहुल ढगे (जिल्हाध्यक्ष, वाहतूक आघाडी), शुभम नरवाडे (तालुकाध्यक्ष कळमनुरी), हर्षल वंजारे खंडू जोडतले ,प्रेम कांबळे, नैतिक जोंधळे, बाळू पंडित इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, राज्यात दुष्काळ पडलेला आहे अशा कठीण प्रसंगात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असताना दूध संघ केंद्राकडून मापात पाप करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत आणि सरकार यावर काही ठोस निर्णय घेत नाही, त्यामुळे आज आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाची होळी करून सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे. अशी प्रतिक्रिया पांडुरंग शिंदे मांजरमकर, (युवा प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती संघटना) यांनी दिली.