आरक्षण बचाव महामेळाव्यासाठी ओबीसी समाज एकवटला – नरसी येथील पुर्वतयारीच्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नरसी येथे जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या महामेळाव्याच्या पुर्वतयारीची बैठक शनिवारी दि 16 डिसेंबर रोजी नरसी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओबीसीच्या मतावर निवडून आलेल्या मराठा आमदारांनी विधानसभेत ओबीसी बद्दल बोलण्याऐवजी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवत असल्याने सकल ओबीसी समाजाने बैठकीत तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्या असून.नरसी येथे होणारा महामेळावा ऐतिहासिक करण्यासाठी सकल ओबीसी समाजाने एकजूट दाखवून कंबर कसली आहे.
नरसी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ शेळके हे होते तर डॉ. बी.डी चव्हाण, अविनाश भोसीकर, नागनाथ घिसेवाड, रवी शिंदे, महेंद्र देमगुंडे, माऊली गिते अदिंची उपस्थिती होती. नायगावसह उमरी, धर्माबाद, भोकर,अर्धापूर, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार तालुक्यातून प्रमुख कार्यकर्ते आले होते. नरसी येथे ८० ते ९० एकरमध्ये महामेळावा घेण्यात येणार असल्याचे संयोजकाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. मेळावा ऐतिहासिक व भव्यदिव्य होण्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणात बैठका घेण्यात येणार असून. तालुकास्तरावरील बैठकांच्या तारखाही यावेळी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न मराठा समाज करत आहेत त्याबद्दल नापसंती व्यक्त करतांनाच ओबीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे ही हेकाडी पणाची व अवास्तव मागणी आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठ्याची ओबीसीत घुसखोरी होवू द्यायची नाही असा निश्चय करण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी महामेळाव्याला येणाऱ्या सकल ओबीसीसाठी जागोजागी जेवनाची व चहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे.
ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी होवू नये व हक्क हिरावला जावू नये यासाठी नरसी येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठा आमदार विधानसभेत मराठा आरक्षणासाठी आवाज उठवत आहे. आणि छगण भुजबळ यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्हाला आमचे आरक्षण टिकवायचे आहे त्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी संयोजकाच्या वतीने करण्यात आले.
————–
ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी व ओबीसीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात नरसी येथे मेळावा आयोजित करण्यात आला असून. या मेळाव्यासाठी भुजबळ साहेबांनी वेळ दिला आहे. त्यामुळे गावा गावातील व वाडी तांड्यावरील ओबीसी समाज मेळाव्याला कसा उपस्थित राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. —– बी.डी. चव्हाण.
—————————–
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. मोहनराव हंबर्डे, नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांना मराठा समाजापेक्षा जास्त मतदान ओबीसी समाजानी केले. त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याऐवजी हे नेते विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आवाज उठवत असून ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्दही काढत नसल्याने या नेत्यांच काय करायचा निर्णय २०२४ मध्ये ओबीसी समाज निश्चित घेईल —– अविनाश भोसीकर