श्री क्षेञ माहूर, कार्तिक बेहरे| वाई बाजार येथे नव्याने बियर बार सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कडून देण्यात आलेले गावठाण प्रमाणपत्र व गाव नमुना आठ पत्रक वांद्यात आले असून तहसीलदार व तत्सम अधिकाऱ्याचे अकृषिक परवाना नसताना नियम व अधिकाराच्या पलीकडे जाऊन ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य कागदपत्रे दिली होती.या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांनी दि.१५ जुलै रोजी वाई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पी.जी.देवकांबळे यांना अंतिम नोटीस पाठवून खुलासा मगविल्याने याप्रकरणी कार्यवाहीचा मुहूर्त जवळ असल्याची चर्चा केली जात आहे.
मागील काळात गावातील दारू बंद करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आता गावात व गावाबाहेर मोठ्या प्रमाणात दारूची दुकाने सुरू करण्याचा चंग बांधला आहे.त्याचाच एक भाग म्हणून दारू दुकान सुरू करण्यासाठी मागेल त्याला ठराव,ना हरकत इत्यादी ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणारे कागदपत्र शक्य शीघ्र उपलब्ध करून दिले जात आहे.परंतु त्यासोबतच कृषीक जमिनीवर गावठाण प्रमाणपत्र व शेत जमिनीचे गाव नमुना ८ नोंदवही ला नोंद घेऊन प्रमाणपत्र दिले जात आहे.
याप्रकरणी तहसीलदार माहूर यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी चौकशीसाठी संपूर्ण कागदपत्रे व स्वयं स्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र वाई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक देवकांबळे यांना दिले होते.परंतु चार महिने लोटल्यानंतर सुद्धा त्यांनी या पत्राचे उत्तर दिले नसल्याने अखेर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला अंतिम नोटीस बजावली असून सात दिवसाच्या आत वाईबाजार येथील बिअर बार गावठाण प्रमाणपत्र इत्यादी बाबत खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे.
विहित मुदतीत खुलासा सादर केला नाही किंवा खुलासा असमाधान कारक असल्यास आपल काहीही म्हणणे नाही असे गृहीत घरुन आपणाविरुध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) २९६४ कलम ३ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे.एकंदरीत या कारवाईमुळे पैसे घेऊन नियमबाह्य कागदपत्र उपलब्ध करून देणाऱ्यांना चाप बसणार आहे.