करियरनांदेड

आयुष्यामध्ये येऊ घातलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा, कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांचे प्रतिपादन

नवीन नांदेड। काळ बदलत चालला आहे. दररोज नवनवीन गोष्टी सर्वच क्षेत्रात पाहायला मिळत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक संकटांचा सामना करणे अपरिहार्य आहे.या परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षक प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये विपरीत परिस्थितीवर मात करण्याचे कसब निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,असे प्रतिपादन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव यांनी केले.
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड येथे कर्मयोगी डॉ.नानासाहेब साहेब जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीक्षांत पदवी वितरण सोहळा १ जानेवारी रोजी घेण्यात आला. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव बोलत होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग खडके यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या सौ.शांतादेवी जाधव, ॲड. श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर. मुजावर, प्राचार्य डॉ.सुरेश घुले, प्राचार्य डॉ.संघमित्रा गोणारकर, डॉ.मोहन चव्हाण,कृषी अधिकारी कल्याने, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे अध्यक्ष गिरीश जाधव, उप प्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड, विद्यापीठाचे रासेयोचे माजी समन्वयक डॉ.नागेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना डॉ.नानासाहेब जाधव म्हणाले की,आज पारंपरिक शिक्षण कालबाह्य होत चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाविद्याल यातील प्राध्यापकाने तळमळीने शिकवले पाहिजे. येत्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. या सर्व गोष्टीचा सामना करण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक नवी ऊर्जा, नवी ताकद निर्माण झाली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबर सर्व महापुरुषांचे विचार व कार्य आत्मसात करीत त्यावर आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळातील महाविद्यालयात अनेक दर्जेदार प्राध्यापक आहेत. महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक, शास्त्रज्ञ, वकील, सामाजिक व राजकीय कार्यात कामगिरी करीत आहेत. येत्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक गतिमान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर देण्यात येईल, असे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी प्रास्ताविक पर भाषणात सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग खडके मार्गदर्शनपर बोलताना म्हणाले की, येत्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबविल्या जाणार आहे . तसेच आपल्या विद्यापीठांतर्गत अधिक दर्जेदार शिक्षण दिल्या जात आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात कौशल्य विकास पूर्ण शिक्षण घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी विद्यापीठ गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालय,जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय, सावित्रीबाई फुले अध्यापक महाविद्यालय,येथील सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

दिलखुलास प्रकट मुलाखत
वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री तथा निवेदिका डॉ. समीरा गुजर (जोशी) आणि व्याख्याते डॉ.विश्वाधर देशमुख यांनी यावेळी डॉ. नानासाहेब जाधव यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत डॉ. नानासाहेब जाधव यांची सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कारकिर्द उजागर झाली.मुलाखतकारांनी छेडलेल्या विविध प्रश्नांना कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. या मुलाखतीत अनेक वेळा श्रोत्यांमध्ये चेतना निर्माण झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन पांचाळ, डॉ.साहेबराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.नागेश कांबळे यांनी केले. सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,क्षेत्रातील प्रमूख मान्यवरासह श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!