
नांदेड| एखादा जुनाट वाडा तेथील जमिनीत पुरलेल धन, तेथील अतृप्त आत्मा, श्याप आणि त्या श्यापातून मुक्त होण्यासाठीची धडपड करणारा नायक, नायिका अश्या अनेक दंत कथा आपण ऐकत आलो आणि अनेक नाट्य लेखकांनी अश्या दंतकथा आपल्या लिखाणात स्थान दिले.
अश्याच एका गूढ रहस्यमय दंतकथा प्रेक्षकांना अनुभवता आली ती महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमुळे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी छत्रपती सेवाभावी संस्था, परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित दिनेश कदम दिगदर्शित “वाडा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
कोड या त्वचारोगाला व त्या संबंधी समाजाच्या कुरूप विचारांना केंद्रभागी ठेवून हे नाटक समाजातील विविध क्रू प्रथांवर मार्मिक भाष्य करते तर विविध प्रसंगी छोट्या छोट्या विनोदांमधून हास्याचे फवारे उडवते तर कधी रहस्यमय, भय रसाची निर्मिती करते.
यात दिनेश कदम, सोनाली डोंगरे, प्रसाद निर्मळे, विद्याधर सिरसाठ, बाळकृष्ण कुकडे, पूजा कुरुंद आणि महेश ज्ञानोबा होनमाने यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला तर प्रकाशयोजना – शिरीष तिर्थकर, संगीत – किरण मेकाले, नेपथ्य – प्रदीप भुक्तरे, विष्णू भताने, रंगभूषा आणि वेशभूषा – रोहिणी महेश होनमाने, यांनी साकारले, रंगमंच व्यवस्था – संतोष कापावार यांनी सांभाळले. सह दिग्दर्शन शेख अकबर बागबान यांनी केले. यशवंत पवार यांनी संघ व्यवस्थापन केले.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी एक उत्तम नाटक पाहिल्याचे समाधान रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दिनांक २५ नोव्हेंबर रोजी देउबाई शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेडच्या वतीने सतिश साळुंके लिखित, डॉ. राम चव्हाण दिग्दर्शित “महात्मा कांबळे” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
