नांदेड| कलावंत हा प्रबोधन विचाराचा पाईक असतो, वेळोवेळी तो समाजाला शहाणपण शिकवत असतो. समाजाने कलावंतांचा सन्मान राखला पाहिजे त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी ललित व प्रयोगजीवी कला संकुलामध्ये केले.
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या पुनर्विचारासाठी गठित करण्यात आलेल्या संगीत विषयक उपसमितीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलास भेट दिली व संगीत क्षेत्रातील गायक, वादक यांच्या समस्या, सूचना व शिफारशी जाणून घेत मुक्तसंचार साधला. त्यावेळी कौशल इनामदार उपसमिती प्रमुख म्हणून बोलत होते. संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर मुक्तसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संगीतकार आनंदी विकास, गायक सचिन चंद्रात्रे, शुभंकर, प्रा. किरण सावंत, प्रा. शिवराज शिंदे यावेळी उपस्थित होते.
कलावंतांनी आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी स्वतःची इकोसिस्टीम निर्माण करायला हवी, असेही कौशल इनामदार म्हणाले. एफएम रेडीओच्या मराठी गाण्यांविरोधी धोरणांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. समारोप करताना डॉ. पृथ्वीराज तौर यांनी समाजामध्ये संगीत साक्षरता वाढीसाठी भरीव प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. संगीतविषयक शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालये व अन्य संस्थांना शंभर टक्के अनुदान मिळायला हवे व विद्यार्थी कलावंतांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृहे असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
संगीतकारांच्या या मुक्तसंवादात नांदेड व परभणी जिल्ह्यातील गायक वादक कलावंत उपस्थित होते. विकास जोंधळे, संजय आठवले, दत्तात्रय पारवेकर, कैलास पुप्पुलवाड, शिवकुमार मठपती, प्रशांत बोंपिलवार, दिगंबर शिंदे, सदा वडजे, गणेश महाजन, प्रदीप गावंडे, रिया येलमेवाड, प्रियंका कोल्हे, गणेश इंगोले, निशिकांत गायकवाड, अभिषेक काचगुंडे, मीनाक्षी आडे, भगवान नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले व प्रश्न विचारले. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. किरण सावंत यांनी तर आभार प्रा. अभिजीत वाघमारे यांनी मानले.