आंतर महाविद्यालयीन ज्ञानतीर्थ युवक महोत्सवामध्ये ‘स्वारातीम’ विद्यापीठ परिसर नांदेडला एकूण दहा कला प्रकारामध्ये पारितोषिके
नांदेड| नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव २०२३ लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयात मोठया थाटात पार पडला. या युवक महोत्सवामध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ परिसर, नांदेड यांनी नेत्रदीपक यश मिळवले. संगीत विभागातील कला प्रकारामध्ये तब्बल आठ पारितोषिके पटकावली.
त्यामध्ये लोकसंगीत कला प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. समाधान राऊत, मुंजाजी शिंदे, शुभम गोंधळी, सारंग भोळे, ओंकार गायकवाड, धोंडीबा, विष्णु गोरे, गणेश महाजन, गणेश इंगोले या विद्यार्थ्यांचा समावेश होता. साथीदार म्हणून गंगाधर कऱ्हाळे, रत्नदिप गवई, शिवकुमार मठपती हे होते. शास्त्रीय ताल वाद्यामध्ये मुंजाजी शिंदे यांनी प्रथम आणि सुरवाद्य या कला प्रकारामध्ये सारंग भोळे हे सुध्दा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. समुहगायन (भारतीय) या कलाप्रकारामध्ये शिवकुमार मठपती, भागवत नरवाडे, नवजोतसिंग लातूरवाले, रिया येलमेवाड, प्रियंका कोल्हे, मिनाक्षी आडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. सुगम गायनामध्ये (भारतीय) भागवत नरवाडे, शास्त्रीय गायनामध्ये नवजोतसिंग लातूरवाले यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. यासह कव्वाली सादर करून युवा महोत्सवात सर्वांची मने जिंकून तृतीय क्रमांक पटकावला. समूह गायन (पाश्चात्य) या कलाप्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. रांगोळी मध्ये टिया परदेशी तर नक्कल मध्ये प्रतिक इंगोले यांनी तृतीय क्रमांकावर यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत, प्रा. नामदेव बोंपिलवार, राहुल जमदाडे, राजेश सरोदे, कैलास पूपूलवाड, अभिजित वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. शैलेश पटवेकर हे होते. संघव्यवस्थापक म्हणून डॉ. शिवराज शिंदे आणि संघव्यवस्थापिका प्रा. वैशाली शेळके यांनी काम पाहीले. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, प्र.कुलगुरु डॉ. जोगेद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विदयार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, ललित व प्रयोगजीवी कला संकूलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.