नांदेड| डीमार्ट परिसरात असलेल्या घरातील एकट्या महिला पाहून तोतया विमा एजंट बनून आलेल्या एका व्यक्तीने घरात घुसून महिलेला मारहाण केली आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या. ही घटना नांदेड शहरातील व्यंकटेशनगर भागात मंगळवारी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. जखमी शुभांगी दोडके (३०) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील डीमार्ट परिसरातील व्यंकटेशनगरमधील रहिवासी व हदगाव तालुक्यातील तामसा ग्रामीण बँकेत कार्यरत असलेले आशिष दोडके यांच्या घरी मंगळवारी दुपारी पत्नी शुभांगी एकट्याच होत्या. दोन्ही मुले शाळेत गेली होती. या वेळात कोणीतरी अज्ञात व्यक्ती विमा एजंट बनून परिसरात फिरत होता. जाधव यांचे घर कुठे आहे, अशी विचारणा त्याने केली. त्यानंतर तो शुभांगी यांच्या घरी जात दरवाजा ठोठावला.
दरवाजा उघडता शुभांगी यांना धक्का देत आतून कडी लावून घेतली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध करताच जवळील वस्तूने डोक्यात वार केला. यात त्या रक्तबंबाळ झाल्या याच संधीचा फायदा घेत घरातील सोने आणि मोबाइल घेऊन तो अज्ञात पसार झाला. अज्ञाताने त्यांचा गळा व मानेवर वार केले. महिलेने शेजाऱ्यांना माहिती दिली दिल्यानंतर पोलिसांनी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही चेक केले असता कॅमेऱ्यात ती व्यक्ती पळून जाताना दिसते आहे. दरम्यान, श्वान व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्यासह भाग्यनगर ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते.