हिमायतनगर। शहरातील वनारसी गल्ली वार्ड क्रमांक 13 मध्ये असलेल्या सार्वजनिक 50 बाय 50 फूट असलेली प्राचीन काळातली बारव विहिरीवर अतिक्रमण करण्यात आले असून, तात्काळ संबंधित अतिक्रमण काढून पुरातन कालीन ठेवा जपावा अशी मागणी मुन्ना भाऊ शिंदे राजे प्रतिष्ठान हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
हिमायतनगर शहराला पांडव कालीन वारसा लाभलेला आहे, आजवर हिमायतनगर शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करताना देवी देवतांच्या मूर्त्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे मूर्त्यांचं शहर म्हणून हिमायतनगर वाढोणा शहराची ख्याती दूरदूर पसरलेली आहे. शहरात अनेक ठिकाणी पुरातन बारव विहिरी असुन, त्या सुरक्षित ठेवून इतिहास कालीन ठेवा जपून ठेवणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. मात्र याचं इतिहास कालीन ठेवा असलेल्या शहरातील वॉर्ड क्रमांक13 मधील वणारसी गल्लीतील विहिरीच्या परिसरात काही जणांनी अतिक्रमण करून सदर विहीर बुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजल्यावर मुन्ना भाऊ शिंदे राजे प्रतिष्ठान हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांनी भेट देऊन पाहणी केली.
आणि या ठिकाणी असलेल्या विहिरी वरील अतिक्रमण हटविणे बाबत दिनांक 25/09/2023 रोजी हिमायतनगर तहसीलदार आदिनाथ शेंडे, हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिडी भुसनूर यांना निवेदन दिले. या तक्रारीची नोंद तात्काळ घेऊन करण्यात आलेली अतिक्रमण हटूनन पुरातन कालीन बारव विहिरीभोवती कंपाउंड करून इतिहास कालीन ठेवा जपावा अशी मागणी केली आहे. अन्यथा राजे प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील मुन्ना भाऊ शिंदे राजे प्रतिष्ठान हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे.