यात्रेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त; 19 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर; 16 ठिकाणी ध्वनिक्षेपक
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा मीडिया सेंटर| श्रीक्षेत्र माळेगाव येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच तगडा पोलीस बंदोबस्तही येथे पाहाव्यास मिळाला.
पोलीस विभागाच्या वतीने 1 हजार 242 अधिकारी, कर्मचारी माळेगाव येथे तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक-1, उपविभागीय अधिकारी-2, पोलीस निरीक्षक-6, पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक- 60, ट्राफिक पोलीस 20, तसेच 385 पोलीस कर्मचारी, 88 महिला पोलीस कर्मचारी, 400 पोलीस होमगार्ड, 100 महिला पोलीस होमगार्ड, तसेच परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातून 120 पोलीस कर्मचारी, 30 महिला पोलीस कर्मचारी, 10 ट्राफिक पोलीस व 20 अधिकारी यासह यात्रेत 1 हाजार 242 आधिकारी व कर्मचारी सेवा बजावत आहेत.
यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेक्ष डॉ शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मारुती थोरात, सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात माळेगाव पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत
सीसीटीव्हीद्वारे यात्रा नियंत्रणात
जिल्हा प्रशासनाच्या वतीने माळेगाव यात्रेची पूर्वतयारी गेल्या सहा महिन्यापासूनच करण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने माळेगाव यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार माळेगाव यात्रेत 19 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याद्वारे सर्व माळेगाव यात्रा नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. याचे नियंत्रण माळेगाव येथील पोलीस चौकी येथे करण्यात आले आहे. या कामी पोलीस निरीक्षक एस.डी. निलपत्रेवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सी.एम. सरोदे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक वाव्हळे आणि इतर कर्मचारी सह नियंत्रण करत आहेत.
माळेगाव यात्रेत मंदिर परिसर या ठिकाणी दोन कॅमेरे, माळाकोळी ते नांदेड रोड परिसरात 7 कॅमेरे बसस्थानक, धर्मशाळा, घोडा लाईन, कुंकू मार्केट, मटन मार्केट चौरस्ता, भांडे बाजार चौरस्ता, मंदिर चौरस्ता, कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बायपास रस्ता मार्ग असे एकूण 19 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचे सर्व नियंत्रण पोलीस चौकी येथे केले जात आहे.
16 ध्वनिक्षेपक – माळेगाव यात्रेत यावर्षी सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच 16 ठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्र बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही पाहून आवश्यक त्या सूचना पोलीस चौकी इथून दिल्या जात आहेत. यात्रेत आलेले यात्रेत हरवलेली व्यक्ती, बालक यांच्या सूचना, खिसे कापू व चोरांपासून सावध रहा, आपले मोबाईल व पाकीट सांभाळा, महिलांनी आपले दागिने, मौल्यवान वस्तू सांभाळा, लहान मुलांची व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या व त्यांना सांभाळा, भाविकांनी स्वतःची काळजी घ्यावी. अशा सूचना या ध्वनीक्षेपणावरून केल्या जात आहेत.