महाराष्ट्र

गरिबीतून मुक्ती हाच खरा सामाजिक न्याय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

शिर्डी| गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीबांचे कल्याण आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. महाराष्ट्रातील २६ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.

शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील १४ हजार कोटी रूपयांहून अधिक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार राम शिंदे, आ.बबनराव पाचपुते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

“पाच वर्षांपूर्वी शिर्डीत आलो होतो तेव्हा साई शताब्दी वर्ष होते‌. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती‌‌.” असे वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरूवात केली. प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले, महाराष्ट्राला पन्नास वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहेत. पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे. अशी अपेक्षाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.‌ श्री साईबाबा मंदीर दर्शनरांगेचे आज लोकार्पण झाले. दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देश विदेशातील भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. वारकरी संप्रदायाचे वैभव बाबा महाराज सातारकर यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांनी कीर्तन- प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम केले, अशा शब्दात त्यांनी यावेळी बाबा महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्मान भारत कार्ड देण्यात येणार आहेत. या सर्वांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना मोफत शिधावाटप योजनेवरही ४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांच्या मोफत आवास योजनांसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हर घर जल पोहोचविण्यासाठी आतापर्यंत २ लाख कोटी खर्च करण्यात आले आहेत. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देखील पथारी व्यवसायातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांची मदत मिळत आहे. आता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. यातून सुतार, सोनार, कुंभार, मूर्तिकार अशा लाखो कारागिरांना प्रथमच शासनाकडून मदत मिळणार आहे. या योजनेवरही १३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत, असे श्री. मोदी यांनी सांगितले.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी छोट्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून या योजनेतून २ लाख ६० हजार कोटी रुपये दिले आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ हजार कोटी थेट पद्धतीने वर्ग केले आहेत. १९७० मध्ये घोषणा झालेल्या निळवंडे धरण प्रकल्प मागील पाच दशकापासून रखडला होता. या शासनाने या प्रकल्पाला गती दिली. राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी सुरू केलेली बळीराजा जल संजीवनी योजना प्रभावी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत अंतर्गत गेल्या सात वर्षात साडेतेरा लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवण्याची व्यवस्था केली आहे. नुकतीच रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली असून त्यात चना, गव्हाच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यात आली आहे. उसाचे मूल्य ३१५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. गेल्या ९ वर्षात ७० लाख कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले आहे. शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत म्हणून साखर कारखान्यांना लाखो कोटींची मदत शासनाने केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सहकारी चळवळीला बळकट करण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. देशभरात २ लाखांपेक्षा अधिक सहकारी समित्या बनविल्या जात आहेत. सहकारी संस्थांमार्फत कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येत आहेत. छोट्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघांच्या माध्यमातून संघटित केले जात आहे. जितका महाराष्ट्राचा विकास होईल तितकाच वेगाने देशाचा विकास होईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात रेल्वेच्या विस्ताराबरोबर रस्ते विकासाचे काम सतत चालू आहे. ही दळणवळण साधने प्रगती आणि सामाजिक विकासाच्या नवे मार्ग बनतील, असेही प्रधानमंत्र्यांनी सांगितले. २०४७ साली देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना जगात भारताचे नाव विकसित भारताच्या रुपात असेल हा संकल्प करू या, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले.

राज्यात केंद्राच्या सहकार्यातून २ लाख कोटींची विकासकामे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात २ लाख कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आतापर्यंत झाले आहे. देशाचा सर्वंकष विकासाचा ध्यास घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे जात आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, देशाला महासत्ता बनवण्यासाठी श्री. मोदी अविरतपणे कार्य करत आहेत तोच आदर्श घेऊन आपले सरकार सुद्धा गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहे. राज्यात नवीन विकास योजना आणण्याचे महत्त्वपूर्ण काम श्री. मोदी यांनी केले आहे.

राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असून गोरगरिबांना यामाध्यमातून विनामूल्य उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांना पाच लाखापर्यंत विविध आरोग्य विषयक सुविधांचा कॅशलेस स्वरूपात लाभ दिला जात आहे. असे त्यांनी सांगितले. शिर्डी साईबाबा मंदीर दर्शन रांगेचा फायदा असंख्य भाविकांना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने गेल्या वर्षभरात ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. असेही ते म्हणाले.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भाला देण्याचा आराखडा तयार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१७ मध्ये शिर्डी येथे भूमिपूजन केलेल्या कामांचे उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते होत आहे. जगभरातून साईभक्त येथे येतात त्यांच्याकरिता अनेक सुविधा देण्यात येत आहेत. अनेक वर्षापासून वाट पाहायला लागलेल्या निळवंडे प्रकल्पाला २०१६ – १७ मध्ये आम्ही गती दिली. गेल्या ९ वर्षात प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सिंचन योजनांसाठी ३० हजार कोटी रूपये दिल्यामुळे राज्यात अनेक सिंचन योजना राबविता आल्या. पीएम किसानच्या धरतीवर नमो किसान योजना सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

महाराष्ट्राचा ५० टक्के भाग अवर्षणग्रस्त आहे. या भागाला पाणी दिल्याशिवाय महाराष्ट्रातील आत्महत्याची संख्या कमी होणार नाही. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी नदीपात्रात वळते करून मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करू शकतो. या योजनेचा आराखडा तयार केला आहे. तसेच वैनगंगा नदीच्या खालील भागातून वाहून जाणारे १०० टीएमसी पण्यापैकी ६७ टीएमसी पाणी नळगंगा मध्ये आणू शकतो. ज्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू शकतो. यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पांनाही मदत करावी. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे व्यक्त केली.

केंद्र शासनाच्या पाठबळामुळे निळवंडेचे स्वप्न साकार – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाच्या ५३ वर्षाच्या इतिहासात निळवंडे धरण प्रकल्पास गती मिळाली नव्हती. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाने या प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे स्वप्न साकार झाले आहे. महाराष्ट्र ही भक्ती – शक्तीची भूमी आहे. प्रधानमंत्री यांच्या भेटीतून लोककल्याणसाठी काम करण्याची उर्जा मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे विकास हे समीकरण घट्ट झाले आहे. आज अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. निळवंडे धरण होत असतानाच योग्य प्रकारची पीके घेण्यात यावीत. शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज व एक रूपयात पीक विमा असे अनेक कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे यावेळी स्वागतपर भाषण झाले. निळवंडे धरण प्रकल्पामुळे लाभक्षेत्रातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्य शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीत आघाडीवर असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी संपत नाना राक्षे, खरैनूसा बशीर शेख, सविता गणेश राजभोज यांना आयुष्मान कार्ड तसेच स्वामित्व योजनेचे लाभार्थी दगडू भागवत गिते, शहाजी शंकर लोके यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी, मेरी माटी मेरा देश अभियानात अहमदनगर जिल्ह्यातून संकलित करण्यात आलेल्या मातीचा कलश प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या विकास प्रकल्पाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन व लोकार्पण
 महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ
 शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन (प्रकल्प खर्च रू.१०९ कोटी)
 निळवंडे धरण डाव्या कालव्याचे लोकार्पण (रू.५१७७ कोटी )
 राष्ट्रीय महामार्ग-१६६ च्या सांगली व बोरगाव चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण (रू.११०२ कोटी)
 जळगाव ते भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण (रू.६४० कोटी)
 कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रकल्पाचे लोकार्पण (रू.२३७ कोटी)
 मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ (रू.२२१ कोटी)
 अहमदनगर येथे माता व बाल आरोग्य जिल्हा रूग्णालय भूमिपूजन (रू.२५.४५ कोटी)
 राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत अहमदनगर येथील आयुष रूग्णालय उद्घाटन (रू.९ कोटी)
 १.११ कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ
 स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!