नांदेड/हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमणवाडी येथील जयश्री सुदाम जाधव या मुलीने प्रियकराच्या धमकीसत्राला कंटाळून दिनांक 11 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला २५ दिवसाचा कालवधी लोटला मात्र हिमायतनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या प्रियकरास अटक नं करता फरार होण्याची मुभा दिली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एव्हढेच नाहीतर तपास अधिकाऱ्यांनी यामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच आरोपी मोकाट फिरत आहेत. इतर आरोपींना बेलवर सोडून दिल्याने मयत मुलीच्या नातेवाईकांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर दि.०३ पासून सहकुटुंब आमरण उपोषण सुरु केले आहे. रविवारी उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली असता तिघांची प्रकृती खालावली आहे. मात्र कुटुंबीयांनी जोपर्यंत मुलीच्या मृत्यूस कारणीभूत मुख्य आरोपी प्रियकरासह अन्य आरोपींच्या अटक केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्र घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमनवाडी येथील मुख्य आरोपी पवन उर्फ राजु सुभाष आडे याने कु.जयश्री सुदाम जाधव हिला लग्नाचे आमीष दाखवुन प्रेमसंबंध जुळविले आणि तिचा गैरफायदा घेत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. आणि पुन्हा लागण करण्यास नकार देत आरोपी पवन उर्फ राजु सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे व सोनु दिलीप आडे यांनी दि. 09/11/ 2024 रोजी मयत मुलगी जयश्री ही शेताला जात असतांना रस्त्यात अडवुन तु आमच्या मुलाचे पाठीमागे का..? लागली आहे. असे म्हणुन तुला पेट्रोल टाकुन जिवनाशी खतम करतो असे म्हणत जिवंत जाळुन टाकण्याची धमकी दिली होती. याची माहिती मयत युवतीने आई वडील शेतात काम करीत असताना येऊन घाबरलेल्या अवस्थेत घडलेली घटना सांगितली. यावेळी आई वडिलांनी तिला समजुन घालुन शांत केले.
दि.11/01/2024 रोजी (गुरुवारी) शेतकरी जाधव कुटुंब नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले असता एकटीच घरी असताना मुलीने प्रियकराच्या भिती पोटी, वारंवारच्या त्रासामुळे व त्याचे धमकीच्या फोनमुळे वैतागुन राहत्या घरी ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बि.डी. भुसनुर, महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव व इतर पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आणि शवविच्छेदन हिमायतनगर ग्रामीण रुग्णालय येथे करुन मुलीचे प्रेत कुटुंबाच्या ताब्यात दिले. मुलीच्या मृत्युला कारणीभुत असणाऱ्या आरोपीला जो पर्यत अटक करणार नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्र मुलीच्या नातेवाईकांनी घेतला होता.
त्यावेळी तत्कालीन पोलिस निरीक्षक भूसनुर यांनी नातेवाईकांची फिर्याद नोंदवुन घेऊन पवन उर्फ राजु सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनु दिलीप आडे, यांच्या विरुध्द कलम 306, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. आणि आरोपींना 2 दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नातेवाईकांनी मयत मुलीवर अंत्यसंस्कार केले. या घटनेला २५ दिवसाचा कालावधी लोटला परंतु आजपावेतो कु.जयश्रीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सुदाम शामराव जाधव, (मयताचे वडील), सौ.अनीता सुदाम जाधव, (मयताची आई), शामराव लोका जाधव, (आजोबा) , अनिल शामराव जाधव, (काका) , कुरमाबाई अनिल जाधव, संजय शामराव जाधव, प्रकाश लोका जाधव, रमेश लोका जाधव, वसंत नारायण जाधव (उपसरपंच), रामराव लोका जाधव, आकाश प्रकाश जाधव, सुदाम शामराव जाधव या आकार जणांनी फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तहसिल कार्यालयासमोर शनिवार दिनांक ०३ पासून अमरण उपोषण सुरु केले आहे. आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणातील तिघांची प्रकृती बिघडली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नूतन पोलीस अधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं
हिमायतनगर पोलीस निरीक्षक पदाचा पदभार घेतलेले नूतन पोलीस अधिकारी एस.डी.जरड यांना सुरुवातीच्या दिवसापासूनच हिमायतनगर शहरात झालेल्या हिमायतनगरातील ऑनर किलिंग घटनेचा तपास, शहरात व तालुक्यात सुरु असलेल्या गुटखा, मटका, जुगार, अवैध्य देशी विदेशी दारू विक्री व शालेय मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोऱ्यांचा बंदोबस्त आणि हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमनवाडी येथील गळफास घटनेतील आरोपींच्या अटकेसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे फरार आरोपीला अटक करण्याचे मोठं आव्हान उभे आहे.