मुलींच्या शिक्षणासह बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी योजना” प्रभावीपणे राबवा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
नांदेड| मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे या उद्देशाला साध्य करणारी “लेक लाडकी योजना” शासनाने आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्त्वपूर्ण म्हणून पाहिली जाते.
1 एप्रिल 2023 पूर्वी जन्माला आलेल्या दोन मुलीसाठी ही योजना अनुज्ञेय आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यावर 6 हजार, सहावीत गेल्यावर 7 हजार, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये असे एकुण 1 लाख 1 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते. ही योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
श्रीक्षेत्र माहुरगड येथील श्री रेणुका देवी, श्री दत्त शिखर संस्थान येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, जिल्हा माहिला व बालकल्याण विकास अधिकारी रमेश कांगणे व इतर मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी पोषण माह, बेटी बचाओ-बेटी पढाओ, माझी मुलगी माझा अभिमान याबाबत माहिती घेतली. महिला बचतगटाच्या माहूरगड येथील स्टॉलला त्यांनी भेट दिली.