नांदेड| स्थानिक जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड व नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत गोदावरीच्या रम्य किनार्यावर बंदाघाटवर दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले असून, यात महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत व नांदेडचे स्थानिक कलावंत आपल्या विविध कलागुणांचा आविष्कार सादर करणार आहेत. नांदेडकरांसाठी गीत, संगीत, नृत्य व काव्य मैफिल अशा विविध कार्यक्रमांची मेजवाणी यामुळे मिळणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देण्यात आले. त्यानुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता नांदेडच्या सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या शबद किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या प्रमुख संयोजनाखाली भक्तीचा भावघाट हा गित संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गायक सुरमणी धनंजय जोशी, गायिका राजश्री ओक (छत्रपती संभाजीनगर) हे प्रमुख गायक असणार असून, त्यांना तबला साथ प्रशांत गाजरे व पखवाजवर विश्वेश जोशी तर हार्मोनियमवर मिहिर जोशी साथसंगत करणार आहेत. तर तालवाद्य भगवानराव देशमुख यांची साथ असणार आहे.
दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता सुर दिपावली हा शास्त्रीय, उपशास्त्रीय, बंदीशी, अभंग आणि नाट्यसंगीताची सुरेल मैफल असणारा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती प्रा.सुनील नेरलकर अध्यक्ष स्वयंवर प्रतिष्ठाण नांदेड यांची असणार असून, पुणे येथील प्रख्यात गायक पं.ईश्वर घोरपडे, (पं.विजय कोपरकर) यांचे शिष्य यांचा हा कार्यक्रम असेल. त्यांना साथसंगत प्रशांत गाजरे, विश्वेश्वर कोलंबी, नचिकेत हरीदास, सचिन शेट्ये यांची असणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हास्य फराळ-हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती गझलकार बापू दासरी यांची असणार आहे. यात संतोष नारायणकर (परभणी), अनिल दिक्षित (पुणे), अरुण पवार (परळी), शंकर राठोड (नायगाव) या मान्यवर कवींचा समावेश असणार आहे. १३ नोव्हेंबर रोजीच सायंकाळी सात वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवाणी यांचा व त्यांच्या शिष्य गणांचा नृत्य झंकार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात नांदेडचे अनेक नृत्य कलावंत सहभागी होणार आहेत.
१४ नोव्हेंबर रोजी सकाळी दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गदिमा एक गीत यात्री असे या कार्यक्रमाचे नाव असून, या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांची आहे. तर या कार्यक्रमाची निर्मिती पत्रकार विजय जोशी यांची आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सिध्दोधन कदम यांचे असून, विशेष मार्गदर्शन प्रमोद देशपांडे, उमाकांत जोशी यांचे आहे. या कार्यक्रमात प्रख्यात गायक प्रा.अशोक ठावरे, सौ.आसावरी जोशी बोधनकर (मुंबई), वर्धिनी जोशी हयातनगरकर (पुणे), प्रणव पाडोळे, मेघा गायकवाड, डॉ.कल्याणी जोशी सहभागी होणार आहेत.
संगीतसाथ राजू जगधने (संभाजीनगर), गौतम डावरे, कपिल धुळे, रविकुमार भद्रे आदी करणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रमुख प्रा.विजय बंडेवार हे असणार आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आनंदीविकास यांच्या संगीत दिग्दर्शन निर्मिती-संकल्पनेतून गोदेकाठी विठ्ठल मेळा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची संहिता व निरुपण देविदास फुलारी यांची आहे. या कार्यक्रमात विश्वास अंबेकर, शुभंम कांबळे, अपूर्वा कुलकर्णी, मिताली सातोनकर, पद्माकर कुलकर्णी आदी मान्यवर गायक सहभागी होणार आहेत. संगीतसाथ विकास देशमुख, वेदांत कुलकर्णी, राघव जोशी, अमोल लाकडे, विठ्ठल सोनाळे, तानाजी मेटकर, हावगी पन्नासे हे करणार आहेत.
१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता संयाती-दिव्यत्वाकडे घेवून जाणारा एक नृत्य प्रवास हा कार्यक्रम होणार आहे. चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द नृत्यांगणा सृष्टी जुन्नरकर (मुंबई) यांची ही निर्मिती आहे. यात मनोज देसाई व प्राजक्ता गुजर (मुंबई) हे गायक असणार आहेत. यात विवेक मिश्रा, अधीरा गिरीधरण, गणेश सावंत, अल्का गुजर हे संगीतसाथ करणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता कबीर वाणी हा कार्यक्रम श्वेता देशपांडे मुंबई व त्यांचे सहकारी सादर करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमाला नांदेडच्या व परिसरातील रसिक, प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, विधी अधिकारी अॅड.आनंद माळाकोळीकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार चारुदत्त चौधरी, विजय जोशी, अॅड.गजानन पिंपरखेडे, लक्ष्मण संगेवार, सुनिल नेरलकर, डॉ.सान्वी जेठवाणी, उमाकांत जोशी, विजय बंडेवार, गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक स.ठाणसिंघ बुंगई, वसंत मैय्या, कला शिक्षक-गजानन सुरकुटवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.