हिमायतनगर,अनिल मादसवार| आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सतत पाठपुराव्यामुळे श्रावण बाळ/संजय गांधी /इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान मंजूर झाले असून, दिवाळीपूर्वी सर्व लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांची दिवाळी गोड होईल अशी माहिती आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यापासून तालुक्यातील श्रावण बाळ/संजय गांधी /इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान रखडले होते. याबाबत काही महिला व पुरुष लाभार्थ्यांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीभेट घेऊन रखडलेले अनुदान मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि तहसीलदार गायकवाड यांना निराधारांचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले होते.
त्यानंतर दोन तीन वेळा याचा पाठपुरावा केला आहे. तसेच मंजूर झालेले अनुदान हिमायतनगर तहसिलदार गायकवाड यांच्याशी संपर्क करुन लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्याच्या सुचना दिले होते. त्यानंतरअंदाजे ३५०९ निराधार लाभार्थी यांच्या खात्यात अंदाजे १ कोटी ३९ लक्ष रुपये जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने चालू केलेली आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे निराधारांच्या खात्यात रक्कम जमा होणार असून, दुष्कजन्य परिस्थितीत रक्कम मिळणार असल्याने निराधार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.