जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
नांदेड| सन 2023-24 या वर्षात 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सर्व जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आली आहे. या मोहीमेसाठी बीओपीव्ही ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लस आवश्य पाजवून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील 2 लाख 52 हजार 916 बालके व शहरी भागातील 64 हजार 213 बालके तसेच मनपा भागातील 82 हजार 569 बालके असे एकूण 0 ते 5 वर्ष वयोगटातील 3 लाख 99 हजार 698 बालके अपेक्षित लाभार्थी आहेत. या मोहिमेत ग्रामीण भागातून 2 हजार 236 व शहरी भागातून 255 तर मनपा भागात 276 असे एकूण 2 हजार 767 पोलिओ बूथ उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण 7 हजार 265 कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यासाठी 25 हजार 862 लसीचे व्हॉयल्स उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.
मोहीमेच्या दिवशी बूथवर लस पाजविल्या नंतरही वंचित राहिलेल्या बालकांसाठी नंतर ग्रामीण भागातून 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस याप्रमाणे कर्मचारी गृह भेटी देवून बालकांना लस देतील. या लसीकरण मोहीमेसाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी निता बोराडे यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे देशात 13 जानेवारी 2011 नंतर आजपर्यत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच देशाला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये मिळालेले आहे.