
नांदेड| विविध सेवा कार्याबद्दल रविवार दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य तथा ग्रंथ संमेलनात मान्यवरांच्या हस्ते धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना ‘ भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार ‘ देण्यात येणार असल्याची घोषणा संयोजक तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केली असून, ठाकूर यांच्या पुरस्काराची संख्या ८६ होत असल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन च्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि ४ आयोजित करण्यात आले आहे. पंजाबातील घुमान येथे संपन्न झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर संत नामदेव महाराज यांच्या ७५४ व्या जन्मशताब्दी निमित हे संमेलन नांदेडच्या गुरुनगरीत भरविले जात आहे.या संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची बाणी, विचार याबाबत विचारमंथन, चर्चा, व्याख्यान, ग्रंथदिंडी, कवीसंमेलन आणि नानक साई फाऊंडेशन च्या पुरस्करांचे वितरण आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
१४ वर्षात ८ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेमध्ये एक अनोखा पायंडा पाडलेला आहे. वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८५ उपक्रम ते नांदेडमध्ये घेतात. रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा कायापालट हा उपक्रम गेल्या ४० महिन्यापासून सुरू आहे.अन्न वाया जाऊ नये तसेच नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी भाऊचा माणुसकीचा फ्रिज ठेवण्यात आला आहे. गेल्या १५ महिन्यापासून एकही दिवस खंड न पडता दररोज किमान ४० ते १२० डबे या फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात.५ वर्षापासून दरवर्षी हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २००० पेक्षा जास्त ब्लॅंकेट चे वाटप त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
पावसाळ्यात कृपा छत्र या उपक्रमां अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारापेक्षा जास्त छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या व्यक्तींसाठी चरण सेवा या उपक्रमा अंतर्गत चप्पला वाटप करण्यात येते. देशातील सर्वात मोठे कवी संमेलन नरेंद्र देवेंद्र महोत्सव गेल्या वीस वर्षापासून दिलीपभाऊ घेत असतात. या कार्यक्रमाला लाखो रसिक रात्रभर उपस्थित राहतात. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते स्वतः४२ वेळा रक्तदान करून ५६०० पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या दिलीप ठाकूर यांनी जमा केले आहेत.
नांदेड मध्ये कोरोना लस देण्यास सुरू झाली त्या दिवसा पासून संपे पर्यंत ९०१ दिवस दररोज दवाखान्यात त्यांनी मास्क,सॅनिटायझर बिस्किट व पाण्याची बॉटल वितरीत केले. हर घर तिरंगा या उपक्रमात हजारो तिरंगे झेंडे त्यांनी मोफत वितरित केले आहेत. कश्मीर फाइल्स,केरळ स्टोरी यासारखे चित्रपट शेकडो मुलींना मोफत दाखवून त्यांनी जनजागृती केली आहे. गेल्या २२ वर्षापासून अमरनाथ सह इतर धार्मिक यात्रा काढून हजारो ज्येष्ठ नागरिकांना किफायतशीर दरात देवदर्शन घडवले आहे. पाऊस दिंडी, चालण्याच्या भव्य स्पर्धा, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, विविध पदयात्रा यासारखे अनेक उपक्रम दिलीपभाऊ हे नियमित राबवीत असतात. त्यामुळे त्यांना ” भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार ‘ देण्यात येणार असल्याची माहिती पंढरीनाथ बोकारे यांनी दिली आहे.
