प्रमाणित लेखापरीक्षकांचे देवगडला राज्यस्तरीय अधिवेशन
नांदेड| महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड (अहमदनगर) येथे करण्यात आले आहे. मंगळवार दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री दिलीप वळसे व महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी देवगडचे भास्करगिरी महाराज, प्रकाशानंदगिरी महाराज, राज्याचे सहकार आयुक्त सौरभ राव व साखर आयुक्त अनिल कवडे आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहेत. बुधवार दि.२१ फेब्रुवारी रोजी दुपारी या अधिवेशनाचा समारोप होईल अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी दिली.
दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर व ज्योती मेटे, सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर, सेवानिवृत्त अप्पर निबंधक एस.बी.पाटील, जिल्ह्याचे उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम, पुणे जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब जंगले, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बारहाते, विशेष लेखापरीक्षक पुणे सदानंद वुईक, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत अशी माहिती असोसिएशनचे सचिव उमेश देवकर यांनी दिली.
या अधिवेशनास राज्यातील सर्व जिल्ह्यातून सुमारे १००० हून अधिक लेखापरीक्षक उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने तसेच लेखापरीक्षकांच्या समस्यांवर चर्चासत्र होणार आहेत. या राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन असोसिएशनचे उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, विश्वस्त बाळासाहेब वाघ, श्रीकांत चौगुले व संजय घोलप आदी करत आहेत. या अधिवेशनाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त लेखापरीक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऑडिटर कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन,नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम कदम, कोषाध्यक्ष राजेश सालेगांवकर, जिल्हा सचिव रविशंकर विश्वकर्मा, सहसचिव संतोष सरकटे आदींनी केले आहे.