नांदेड| नांदेड जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांच्या शेतातील 17000 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून दोन शेतकर्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रविवारी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व प्रचंड पाऊस व गारपिटासह चार तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस व गारपिटीमुळे हिमायतनगर तालुक्यात 7218, हेक्टर धर्माबाद तालुक्यात 1395, हेक्टर, उमरी तालुक्यात 8060 हेक्टर तर भोकर तालुक्यात 556 हेक्टर, तुर, गहू, ज्वारी, हरभरा, केळी, फळबागा व भाजीपाला असे 17 हजार 229 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा चोर येथील दत्ता दिगंबर वाघमारे व उमरी तालुक्यातील शेळगाव येथील संभाजी रामजी चुकेवार या दोन शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्यांना नुकसान भरपाई प्रत्येक हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्याचे आदेश देऊन दोन मृत्यू पावलेल्या शेतकर्यांनाही त्वरित मदत करावी.
अशा स्वरूपाचे निवेदन नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. याप्रसंगी प्रा.डी.बी.जांभरुणकर, इंजिनीयर विश्वंभर भोसीकर, प्रकाश मांजरमकर, चंपतराव हातांगळे, प्रांजली रावणगावकर, सुभाष रावणगावकर, बालासाहेब मादसवाड, प्रा.मजरुद्दीन, रामदास पाटील आदी जण उपस्थित होते.