नांदेडच्या श्री. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शासकीय रूग्णालये व्हेंटिलेटरवर आहेत याची जाणीव झाली. सतत राजकारणात डुंबलेल्या नेत्यांना अचानक जाग आली. मग भेटी, आढावा, सोय- गैरसोय आणि सवयीप्रमाणे आरोप प्रत्यारोप करून झाले. वास्तव कधी बदलणार हे निश्चित नाही. दरम्यान अचानक उडालेला धुरळा आता पुन्हा जमिनीवर येत आहे. मात्र अशा परिस्थितीत दखल घ्यावी आणि कौतुक करावे असे एक शासकीय रूग्णालय नांदेडातच आहे याची कदाचित आपल्याला कल्पना नसेल.
महिला आणि बालकांसाठी नांदेडच्या शाम नगर भागात कस्तुरबा गांधी स्री रूग्णालय स्वाभिमान आणि कर्तव्य पूर्तीने ताठ मानेने उभे आहे. या ठिकाणी मागील वर्षभरात बालक व मातेचा मृत्यु दर शुन्य आहे हे विशेष! पण कोणत्याही राजकीय नेत्यांना या रूग्णालयात येऊन येथे जीव ओतून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे वाटले नाही. शासकीय रूग्णालयात शौचालयाची साफ सफाई केली खरी पण त्याच रूग्णालयाने पाठवलेल्या सफाई कामगारांकडून रूग्णालयाची आरशसारखी केलेली सफाई ना खा. हेमंत पाटलांनी पाहिली, ना खा. चिखलीकरांनी की माजी मुख्यमंत्र्यांनी. एवढेच नव्हे तर नांदेड उत्तराच्या आमदारांनीही. पण ते दखल देऊन याठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधांसाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा येथील प्रशासनाला आहे.
शुन्य मृत्यू दर
येथील उपलब्ध सुविधांचा परिपूर्ण वापर, डॉक्टर आणि कर्मचारी यांचा समन्वय व सेवाभाव याचा फायदा येणाऱ्या रूग्णांना होत आहे. याठिकाणी गेल्या वर्षभरात अपवाद वगळल्यास नवजात अर्भकाचा मृत्यू दर शुन्य एवढा आहे.
स्वच्छता
फरशीवर केस जरी पडला तरी दिसेल एवढी स्वच्छता याठिकाणी पाळली जाते. बाह्य रूग्ण विभाग किंवा आंतररूग्ण विभागात रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पायातील चप्पल – बुट बाहेरच सोडावे लागतात. खाजगी रूग्णालयापेक्षाही याबाबतीत कडक शिस्त आहे.
शंभर खाटा
शंभर खाटांची क्षमता असलेल्या रूग्णालयात पूर्ण क्षमतेने रूग्ण प्रवेशित आहेत. दिवसेंदिवस दिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने गरजूंना सेवा देण्यासाठी डॉक्टर हतबल होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व नावलौकिक वाढल्याने रूग्णसंख्या वाढत असून या ठिकाणी आणखी किमान शंभर खाटांची सोय करणे आवश्यक आहे. मागील सहा महिन्यात ३० हजार रूग्ण या ठिकाणी येऊन गेले आहेत.
नवजात अर्भक अतिदक्षता विभाग
खाजगी रूग्णालयाला लाजवेल असे अत्याधुनिक नवजात अर्भक अतिदक्षता विभाग या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्याची क्षमता फक्त दहा आहे. याची संख्या वाढवणे देखील आवश्यक आहे. खाजगी रूग्णालयात यासाठी साधारण पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो. तो याठिकाणी टळतो. यातही दोन विभाग असून आंतररूग्ण व बाह्य रूग्ण यांच्यासाठी दोन विभाग आहेत. येथील बालकांच्या मातांसाठी विशेष कक्ष आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका टाळता येतो.
सिझेरीन व नैसर्गिक बाळंतपण
नैसर्गिक बाळंतपणापेक्षा सिझेरीन पद्धतीने बाळंत होण्याची संख्या वाढते आहे. या रूग्णालयात नैसर्गिक आणि सिझेरीन पद्धतीने बाळंत होणार्या मातांना वेगवेगळ्या कक्षात ठेवले जाते. त्यामुळे उपचार करताना व सुश्रुषा करताना कर्मचाऱ्यांना सोपे होते.
अतिदक्षता विभागाची गरज
डिलिव्हरीसाठी आलेली माता एखादेवेळी गंभीर होऊ शकते. अशावेळी उपचारासाठी अतिदक्षता विभागाची त्वरित गरज आहे. तसेच फिजिशिएनची भरतीही आवश्यक आहे. दरम्यान, दवाखान्याच्या शेजारीच मोडकळीस आलेली इमारत आहे. ती पाडून नवीन इमारत बांधल्यास आणखी जागा उपलब्ध होऊन अधिक रूग्णांना सेवा देता येईल.
महापालिका इकडे लक्ष देईल का?
कस्तुरबा स्री रूग्णालयाच्या परीसरातच मागील काही वर्षांपासून महानगरपालिकेचे स्वच्छता गृह बांधून तयार आहे. पण त्याचा वापर होत नाही. ते रूग्णालयाला वापरण्यासाठी दिल्यास रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड होणार नाही. बाजुलाच बंद अवस्थेत महापौर निवास आहे. ते उपलब्ध करून दिल्यास प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना थांबण्यासाठी सोईचे होईल व रूग्णसेवेसाठी अधिकचा वेळ देता येईल. महापालिकेने या जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललिता मनुरकर यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आवश्यक मनुष्यबळ
नांदेड शहरातील उच्चभ्रू, मध्यमवर्गीय तसेच बाहेरगावाहून देखील महिला, बाल रूग्ण या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. रूग्णांची संख्या वाढत चालल्याने मनुष्यबळ वाढविणे आवश्यक आहे. याठिकाणी एकुण ९४ मंजूर पदे असून फक्त ८० भरलेले आहेत. सुरक्षा रक्षक ९ आहेत ज्यात दोन महिला रक्षकांचा समावेश आहे. यात आणखी सुरक्षा रक्षक वाढवणे आवश्यक आहे. शंकरराव चव्हाण रूग्णालयातील प्रकारानंतर रूग्णांची व नातेवाईकांची अरेरावी वाढली आहे. प्रत्येकजण डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे संशयाने पहात असल्याचे तेथील एका कर्मचाऱ्याने सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या घरचे बाळंतपण
जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सुविद्य पत्नींचे याच ठिकाणी बाळंतपण झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा ओढा वाढला आहे.
क्षणोक्षणी करूणा पाटील
रूग्णालयाच्या पहिल्या अधिक्षक डॉ. करूना पाटील यांनी सुरूवातीपासून स्वच्छता, शिस्त आणि सेवाभाव याबाबत एक शिस्त घालून दिली होती, ती शिस्त आजही त्यांच्यानंतर कटाक्षाने पाळली जात आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक डॉक्टर, नर्स क्षणोक्षणी त्यांची आठवण काढताना दिसून येतात. एक अधिकारी शासकीय आणि तेही संवेदनशील ठिकाणी शिस्तीचे धडे घालून देऊ शकतात याचे उदाहरण या रुग्णालयात पहायला मिळते.
दवाखाना नव्हे ‘कुटुंब
अधिक्षक डॉ. ललिता मनुरकर, डॉ. नंदिनी जाधव, डॉ. मोहिनी भोसीकर, डॉ. अर्चना मस्के, डॉ. मधुकर हत्ते, डॉ. राम भुसंडे आणि इतर कर्मचारी हे कुटुंबासारखे रहातात. त्यामुळे त्यांच्यात चांगला समन्वय दिसून येतो. याचे सकारात्मक परिणाम रूग्णसेवेवर दिसून येतात.
लिखाण … डॉ. दिलीप शिंदे, लोहगावकर
या दवाखान्यात लवकर भरती करुन घेतले जात नाहीं. पेशंटला… काही 5ठराविक कच भरती केली जाते… ड्रॉ back 🔙 आहे येथे