नांदेड| येत्या खरीप हंगामात कापूस पिकाच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडून पावती घेवूनच करावी. अनाधिकृत विक्रेते व फेरीवाले यांच्याकडून कापूस बियाण्याची खरेदी करु नये. तसेच कापूस लागवड 1 जूननंतरच करावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात कापूस पिकाचे 20 लाख 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु गतवर्षीची कापूस उत्पादकता विचार करता कापूस पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस पिकाची लागवड नगदी पिक म्हणून केली जाते. कापूस पिकाची उत्पादकता मागील काही वर्षे गुलाबी बोंडअळीमुळे कमी झालेली आहे. परंतु गतवर्षी कापूस पिकाची पेरणी 1 जूननंतर केल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादकता मध्ये 2022 च्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच कापूस पिकाची पेरणी करावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.