
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| विनवळ,जव्हार – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेचे उदघाटन श्री प्रकाश निकम, अध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांच्या हस्ते व राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू दिव्या कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय आश्रमशाळा विनवळ ता जव्हार येथील क्रीडासंकुलात दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे.
सदर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 27,28 व 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत संपन्न होणार असून,त्यामध्ये 100,200,400,600,800,3000 मीटर धावणे,3000 व 5000 मीटर चालणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, रीले या वैयक्तिक वकबड्डी, खोखो, व्हॉलि्बॉल, हॅन्डबॉल ह्या सांघिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पारंपारीक पद्धतीच्या शाळांतर्गत स्पर्धा न होता, ह्यावेळीही केंद्रस्तरीय चाळणी स्पर्धेतून तयार झालेल्या वीर विक्रमगड, वाडा वोरियर, जव्हार चॅलेंजर आणि मोखाडा फायटर्स या चार तालुका संघात ही प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडून, त्यातून पुढील विभागीय क्रीडा स्पर्धासाठी जव्हार प्रकल्पाची संघनिवड पार पडेल.प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेत पूर्ण जव्हार प्रकल्पातील एकूण 1280 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
उदघाटन सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणात श्री प्रकाश निकम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमधील उपजत क्रीडा कौशल्याचे कौतुक करून, संधी आणि सुविधा मिळाल्यास, आदिवासी समाजातूनही मोठया प्रमाणावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला. मी देखील आश्रमशाळेचा विद्यार्थी असून, प्रबळ इच्छाशक्ती आणि परिश्रमाच्या जोरावर, माझ्यासारखा कोणताही विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक आणि यश प्राप्त करू शकतो मात्र स्वतःतील न्यूनगंड आणि जुनाट प्रथा आणि पराभूत मानसिकतेतून आपण बाहेर पडायला हवे असेही प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री निकम यांनी केले.
सदर उदघाटन सोहळ्याला श्री प्रकाश निकम,जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर, राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू दिव्या कर्डीले,श्रीमती नेहा भोसले (भा प्र से ) प्रकल्प अधिकारी, एकाविप्र, जव्हार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, श्री विजय मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, श्री दीपक टिके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार, श्री टी बी सांगवीकर, शिक्षण विस्तार अधिकारी, श्रीमती लिलावती भोरे, सरपंच, ग्रामपंचायत विनवळ, स्पर्धा प्रमुख श्री संजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक, विनवळ आश्रमशाळा, स्पर्धा समन्वयक श्री सोमनाथ शेवाळे व सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री अरविंद भोईर, श्री राजेश पाटील, श्री राजेश कोरडा यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संजय सूर्यवंशी, स्पर्धा प्रमुख यांनी पार पाडले.
