हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रम्होत्सवाला घटनस्थपणाने सुरुवात
हिमायतनगर,परमेश्वर काळे| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रम्होत्सवाची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिपदा रविवारी सकाळी ४ वाजता अभिषेकानंतर घटस्थापनाने करण्यात आली आहे. आगामी उत्सव पर्वकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कांतागुरु यांनी न्यूजफ्लॅश३६०डॉटईनशी बोलताना दिली आहे.
शेकडो वर्षापासून या मंदिरात भगवान व्यंकटेश बालाजी, विष्णू, ब्रम्हदेव, महिषासुर मर्दिनी, स्कंद कार्तिके, श्रीगणेश यासह अन्य देवी – देवतांच्या काळ्या पाषाणातील मनमोहक मुर्त्या स्थापित आहेत. प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी अश्विनशुद्ध प्रतिपद शके १९४५ रोज रविवारी सकाळी ४ वाजता मंत्रोचार वाणीत भगवान बालाजीचा महाअभिषेक महापूजा, आरती करण्यात आली. विजयादशमी रोजी बालाजी मंदिरात येथील मानकरी श्याम पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्यानंतर संध्याकाळी शहरातून निघालेली विजया दशमीच्या मिरवणुकीतील हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. या भक्तांना मंदिराचे पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या हस्ते बुंदीच्या स्वरूपात तीर्थ – प्रसाद वाटप केला जातो.
याच श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात मंदिरात महिषासुर मार्दीनीची मूर्ती असल्यामुळे ब्राम्होत्सव पर्वकाळात बालाजी मंदिर दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. या काळात येथील स्फूर्ती महिला मंडळाच्या वतीने शारदा देवीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. या काळात महिला मंडळाच्या वतीने फुगडी, लेझीम, लंगडी, गायन, रांगोळी, भजनाच्या स्पर्धा घेतल्या जातात. शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला माता शारदा देवीची मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढून विसर्जन केली जाते. संपन्न झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करून कार्यक्रमाची सांगता होते. नवरात्रोत्सवाच्या काळात विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश व कर्नाटकच्या कान्याकोपर्यातून भक्तजन बालाजीच्या दर्शनासाठी येतात.
यादव कालीन बालाजीचे मंदिर
शहरातील पश्चिम बाजूस शेकडो वर्षापूर्वीपासून यादव कालीन भगवान व्यंकटेश बालाजीचे मंदिर आहे. नंतरच्या काळात मंदिराची दुरुस्ती झाल्यामुळे सदर मंदिर हे पुरतान दिसत नसले तरी मंदिरातील मुर्त्या व बांधकामाच्या दगडी शिळावरून ते दिसून येत आहे. बालाजीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून, पूर्व – पश्चिम ३३ फुट ४ इंच लांबी, तर दक्षिण – उत्तर रुंदी २७ फुट ६ इंच आहे. मंदिराचे बांधकाम ४ फुट उंचीच्या जोत्यावर करण्यात आलेले असून, मंदिराच्या उभारणीत मोठ मोठ्या दगडांच्या शीला लावलेल्या आहेत. मंदिराचे सभामंडप ७ बाय १४ फुटाचे असून, गर्भग्रह भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतरालासाठी दोन्ही बाजूने एक एक प्रवेश द्वार ठेवण्यात आले आहे. मंदिराचे शिखर अर्धगोलाकार असून, त्यावर लहान शिखर आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्यात आलेली असून, परंपरेनुसार मंदिराची देखभाल कांतागुरु व गजुगुरु वाळके हे करतात.