आर्टिकलनांदेड

अशोकरावांचा “उतारा” कोणाकडे ? कोण ठोकणार विरोधात शड्डू ?

अशोकराव चव्हाण गेले आणि आले. अर्थात काँग्रेस मधून गेले, तर भाजपात आले. ही घडामोड राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी असली, तरीही त्याचे सर्वाधिक परिणाम- पडसाद हे नांदेड मधूनच जाणवणार हे स्पष्टच आहे. सध्या सर्वात आधी लोकसभेच्या निवडणुका दारी येत असल्याने, त्याच दृष्टीने नांदेडच्या राजकीय वातावरणाचा वेध घेण्याचा प्रत्येक राजकीय पक्ष आणि सामान्यजन प्रयत्न करीत आहेत.

सलग दहा वर्ष केंद्रात भाजपची सत्ता, नरेंद्र मोदींसारखा आश्वासक चेहरा आणि नेतृत्व, त्यातही दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात इतर प्रमुख राजकीय पक्षांची झालेली वाताहत.या पार्श्वभूमीवर विरोधकांकडे असलेल्या मोजक्याच सर्वांकष नेत्यांपैकी अशोकराव चव्हाण हे नाव अग्रस्थानी होते. गत अनेक वर्षांपासून अशोकरावांनी नांदेड जिल्ह्यात एकहाती सत्ता टिकवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जरी येथे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने भाजपचा विजय झाला असला, तरी त्या विजयाला अनेक पैलू होते. त्यात मोदींमुळे भाजपचा वाढता जनाधार आणि चिखलीकरांचा जनसंपर्क ह्या जरी जमेच्या बाजू असल्या, तरीही काँग्रेसचा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’, सामान्य गरजूंना थेट अशोकरावांपर्यंत पोहोचू न देण्यात हातभार लावणारी त्यांच्या भोवतालची चौकडी, त्यातून तयार झालेली नकारात्मकता याही कारणीभूत होत्याच. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात अशोकरावांच्या नंतर प्रभावी व मोठा जनाधार असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अर्थात दादा यांनी त्यावेळी भाजपात जाऊन आपले वजन प्रामाणिकपणे चिखलीकर यांच्या पारड्यात टाकल्यानेच, दादांच्या होम ग्राउंड पट्ट्यात भाजपाला मोठी आघाडी मिळाली.

ही बाब कोणीच नाकारू शकत नाही. अर्थात जिकडे ‘श्रीकृष्ण’ तिकडे विजय अशी काहीशी प्रतिक्रिया त्यावेळी उमटली होती. आजच्या भाजपचा विचार केला, तर डबल इंजिन सरकारने राबवलेली धोरणे, केलेली विकास कामे, दिलेला निधी, त्यांचा परंपरागत आणि प्रेरित मतदार, त्यांचे मजबूत संघटन, पक्षाने उभारलेली प्रचार व मतदान करून घेणारी शेवटच्या टोकापर्यंतची यंत्रणा, यांच्या जोडीला अशोकराव चव्हाण, खतगावकर दादा आणि प्रताप पाटील चिखलीकर हे तीन शीर्ष नेते! या सर्वांचा विचार केल्यास, कितीही मोठ्ठ आव्हान जरी आलं, तरी त्याचा टिकाव लागणार नाही अशीच आजची परिस्थिती आहे. पण जर भाजपने उमेदवार बदलला, तर त्या उमेदवाराच्या कुवतीनुसार विरोधकांचा आत्मविश्वास कमी व अधिक होईल. तसेच पक्षांतर्गत पडद्यामागे काही हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विरोधकांचा विचार केल्यास ही जागा आधीपासून काँग्रेसकडे असल्याने यावेळीही त्यांचाच प्रथम हक्क आहे. पण अशोकराव चव्हाण यांच्या नंतर त्या तोडीचा तर सोडाच, पण सर्वमान्य होऊ शकेल असा नेता त्यांच्याकडे नाही. पक्ष विखुरलेला, कार्यकर्ते व नेते द्विधा मनस्थितीत आहेत अशी अवस्था. शिवाय आर्थिक भक्कमता आणि अशोकरावांसारखे नियोजन हे विषयही तितकेच महत्त्वाचे ठरतात. काँग्रेसने ज्येष्ठ, एकनिष्ठ असलेला उमेदवार देण्याचे ठरवल्यास, त्यातही दादांची पर्यायाने अशोकरावांची कोंडी करण्याच्या हेतूने विचार केल्यास,नायगावकर वसंतराव चव्हाण हे एकच नाव त्यांच्याकडे आहे. अन्यथा भक्कम उमेदवार देण्यासाठी काँग्रेसला बाहेरचाच उमेदवार आयात करावा लागेल. आयात केलेला उमेदवारही त्या तोडीचाच हवा. अन्यथा पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची कमजोरी दिसेल. त्यातून अशोकरावांचेच वजन वाढेल. यापेक्षा ही जागा अन्य सहकार्यांना, विशेषता वंचितला दिल्यास त्यांचा मान राखल्यासारखेही होईल आणि दुसरी एखादी जागा पदरात पाडून घेता येईल अशा प्रकारचा विचार पक्षश्रेष्ठी नक्कीच करतील.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाकडून कमलकिशोर कदम यांचे नाव पुढे येत आहे. कदमांकडे आर्थिक सुबत्ता असली, तरीही ते गत बऱ्याच काळापासून राजकारणातून निवृत्त झाल्यासारखेच आहेत. त्यांच्या पक्षाकडे जिल्ह्यात असलेली नेते मंडळी ही ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीतील असून, जनाधारात सक्रिय नाहीत. महत्त्वाचे म्हणजे या पक्षाकडे म्हणावे तेवढे कार्यकर्तेही नाहीतच. शिवसेना (उबाठा) गटाकडे यावेळी काही प्रमाणात मतदारांची सहानुभूती वाढली असली, तरीही त्यांच्याकडेही संपूर्ण मतदारसंघात प्रभाव (साम, दाम, दंड, भेद, निती) असणारा उमेदवार नाही. हे सर्व पाहता मागच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारी वंचित बहुजन आघाडी मात्र सावध झाली असून त्यांनी यावेळी विरोधक युतीत नांदेड मतदार संघाची मागणी केली आहे. मागच्या वेळी काँग्रेसला पडलेली मते आणि वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मते यांची गोळा बेरीज करून वंचित आपले गणित मांडत आहे.

पण गतवेळी त्यांची उमेदवारी घेतलेल्या प्रा. यशपाल भिंगे यांना त्यांच्या समाज बांधवांनी भरभरून दिलेली मते, यावेळी एकगठ्ठा वंचितला मिळतीलच असे नाही. शिवाय गतवेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मते, ही केवळ पक्षाच्या नावानेच मिळालेली होती असे नसून त्यात मोठा वाटा अशोकराव चव्हाण यांच्याच नेतृत्वावर विश्वास असणाऱ्या मतदारांचा होता ही बाबही लक्षात घेतली पाहिजे.अशा परिस्थितीतही वंचितने अन्य सर्व विरोधकांची एक मोट बांधली तरीही, एम आय एम ऐनवेळी आपला उमेदवार देणार नाही याची खात्री देता येत नाही. दुसरा एक धोका असा की, जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात दुसऱ्या- तिसऱ्या फळीचे जे नेते व लोकप्रतिनिधी सध्या काँग्रेसमध्येच असल्याचा दावा करत आहेत, तो अशोकरावांची भाजपातली “बार्गेनिंग पॉवर” वाढवण्याचाही प्रयत्न असू शकतो. काँग्रेस आमदारांचा विचार केल्यास, जितेश अंतापुरकर आणि मोहनराव हंबर्डे हे विद्यमान आमदार काँग्रेसमध्येच राहिल्यास, त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत तिकिटासाठी प्राधान्य असेल.

पण तेच दोघेजण भाजपात आल्यास सुभाष साबणे, दिलीप कंदकुर्ते, ओमप्रकाश पोकर्णा यांचा त्यांना अडसर असेल. तर हदगावात बाबुराव कोहळीकरही जवळगावकरांची अडचण ठरत आहेत. डी.पी. सावंत, बेटमोगरेकर यांच्याही अशाच व्यथा आहेत. त्यामुळे ‘मोलभावात’ अशोकरावांना या नेत्यांसाठी काही ठोस शब्द मिळाला, तर यापैकी काही जण भाजपात येऊ शकतात. वसंतराव चव्हाणांचीही तशीच अडचण आहे. पण जर वसंतराव हे लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार नसतील, तर तेही लोकसभा मतदानाच्या वेळी सौम्य भूमिका घेऊ शकतात. त्याहीपेक्षा त्यांनी स्वताःच्या वयोमानाचा आणि आपल्या पुढील पिढीच्या राजकीय भवितव्याचा विचार केल्यास, ते केव्हाही भाजपत येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.शिवाय नुकतेच अशोकरावांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी- पडझड भरून काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खडबडून प्रयत्नरत आहेत.या गडबडीत ते,सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आहेत त्याच नेत्यांवरच अधिकच्या जबाबदाऱ्या देत आहेत.

हे सर्वजण पूर्वाश्रमीचे अशोकरावांच्याच मेहरबानीवरचे असल्याने, आवश्यक वेळी त्यांनाही वेगळी भूमिका घेता येईल अशी परिस्थिती आहे. या मतदारसंघातील मुस्लिम बहुल मतदारांचा विचार केल्यास, त्यांचा भाजपला असलेला तात्विक विरोध स्वाभाविक आहे. पण त्यांच्यातच नेतृत्वाच्या विषयावर एकमत असल्याचे सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे त्यांची दीर्घकालीन राजकीय दिशा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे एकमेकांच्या अंतर्गत हेव्यादाव्यामुळे त्यातील मोठा वर्ग, एमआयएमचा उमेदवार असल्यास त्याला मतदान करू शकतात. शिवाय काँग्रेसच्या या मोजक्या असलेल्या मुस्लिम नेत्यांचा सर्वांगीण विकास हा अशोकरावांमुळेच झालेला असून, त्यांच्यामुळेच टिकून आहे. त्यामुळे त्यापैकी काहीजण वेळेवर आपल्या भविष्याच्या विचाराने प्रेरित झाल्यास काय होईल ?असा प्रश्न मुस्लिम मतदारच आपापसात चर्चित आहेत.

एकंदरीत भाजपचा उमेदवार पुन्हा नांदेड जिंकणार असेच काहीसे चित्र सध्या ठळक दिसते. पण एक गोष्ट मात्र नक्की, ती अशी की जर वंचित कडून स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडची जागा टिकून राहत लढविल्यास, विरोधकांच्या इतर कोणत्याही उमेदवारांपेक्षा ते निश्चित वरचढ ठरतील. पण या निवडणुकीत गुलाल कोणाला लावायचा, हे शेवटी मायबाप जनता जनार्दनच ठरवतील हे अंतिम सत्य आहे. अशोकराव चव्हाणांच्या रुपाने जिल्ह्यातील जनतेला एक अतिरीक्त वाढीव खासदार मिळाला ही आजची समाधानाची बाब आहे !

….सुधीर प्रधान, नांदेड, 9421756355 .

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!