
नांदेड| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (चझडउ) 2023 मध्ये महसूल सहाय्यकपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत चिकाळा ता.मुदखेड येथील अनिता सुभाषराव देशमुख या होतकरू व जिद्दी विद्यार्थीनीने बाजी मारली असून तिची सहाय्यक (महसूल) या पदासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे चिकाळा येथील नागरिकांनी अनिताच्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा केला आहे.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर यशाचे अत्युच्चर शिखर आपण गाठू शकतो, याची प्रचिती अनिता देशमुखने दाखवून दिली आहे इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण तिने नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात विज्ञान शाखेतून घेतले. त्यानंतर परभणी येथील कृषी विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय विभागात आपण उच्च पदावर गेले पाहिजे, ही अनिता देशमुखची मनोमन इच्छा होती. त्यासाठी तिने पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा 18-18 तास अभ्यास केला. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस व मार्गदर्शन शिबिराचाही लाभ घेतला.
अभ्यासाशिवाय आणि जिद्द बाळगल्याशिवाय आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही, या भूमिकेने तिने प्रचंड परिश्रम घेत यशाचे हे शिखर गाठले. 2023 मध्ये तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहाय्यक पदाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 11 फेब्रुवारी रोजी आयोगाने जाहीर केला. आयोगाच्या यादीत अनिता सुभाषराव देशमुखचे नाव झळकले आणि तिच्यासह तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या या परिश्रमाचे फळ मिळाले असे सांगताना तिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
अनिता ही चिकाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव देशमुख चिकाळेकर यांची सुकन्या असून मुलीने शैक्षणिक क्षेत्रात गगनचुंबी झेप घेतली पाहिजे, यासाठी त्यांना अनिताला आवश्यक तेवढे पाठबळ दिले, तसेच तिची आई सौ.कुसुम देशमुख यांनीही मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिच्या शैक्षणिक जडणघडणीत तिला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. अनिताच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. चिकाळेकर यांनी सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिले असून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून आ.श्रीजयाताई चव्हाण यांच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेवून तसेच व्यक्तिगत मतदारांशी संपर्क साधून सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी मोठा हातभार लावला होता. विशेष म्हणजे श्रीजयाताई चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्याची पहिली मागणीही मागील चार ते पाच वर्षांपूर्वी चिकाळेकर यांनीच खा.अशोकराव चव्हाण यांना एका निवेदनाद्वारे केली होती. निवडणुकीत श्रीजयाताई चव्हाण यांचा विजय व्हावा यासाठी त्यांनी गुजरातमधील कुबेर भंडारी या देवस्थानाला साकडेही घातले होते. विजयानंतर कुबेर येथे जावून त्यांनी महापुजा व रुद्राभिषेक केला.
कुबेर पावला-चिकाळेकर
अनिताच्या यशाबद्दल तिचे वडिल सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी प्रतिक्रिया देताना तिने मोठ्या संघर्षातून जिद्दीने हे यश पटकावल्याचे सांगितले. कुबेर भंडारीवर आपली श्रद्धा असून कुबेर भंडारीच आपल्याला पावला आहे, असेही ते म्हणाले.
