नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील बरबडा खून प्रकरण पोलीस कोठडीत आरोपी कोणकोणते सत्य उघडतात याची उत्सुकता लागली असून. हे हत्येचे प्रकरण वेगळेच वळण घेण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण अडकतात याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
दोन महिण्यापुर्वी म्हणजे दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.३० वाजता बरबडा येथून मी बाहेर जावून येतो असे सांगून जमीलखान शादूलखान पठाण हा एम.एच. २६ क्यू २५९८ या क्रमांकाच्या मोटारसायकलवर बाहेर गेला होता तेव्हापासून तो गायबच होता. खुन झाल्याचे बरबड्यात वास्तव समजल्यावर मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले प्रथमेश पांपटवार, पवन प्रभाकर माचनाड, माधव राठोड, गोविंद शंकर रेडेवाड व चक्रधर शिंदे हेच आरोपी निघाले त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.
खुनाचा गुन्हा नोंद केल्यानंतर नायगाव येथील न्यायालयासमोर आरोपींना उभे केले असता त्यांना २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्यंकटराव कुसूमे यांनी दिली आहे. सात दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपीकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोठडी दरम्यान पोलीस अधिकारी कोणकोणते सत्य शोधून काढतील याची उत्सुकता लागली आहे.
जमीलखान पठाण याचा खुन झाल्याचे वास्तव समोर आल्यानंतर बरबडा परिसरात वेगवेगळ्या चर्चेचे पेव फुटले असून. खुन करणारे हे काही संत महात्मे नव्हते पण खुन प्रकरणातील सत्य समोर यावे असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणेनी या खुन प्रकरणाचे पाळेमुळे खोदून सत्य समोर आणतील अशी अपेक्षा आहे.