तब्बल ७० किलोमीटर अंतरावरील वनक्षेत्रपालाला नांदेडात अतिरिक्त पदभार !
नांदेड| बहुचर्चित सामाजिक वनीकरण विभागाच्या नांदेड विभागीय वन अधिकारी कार्यालयात तब्बल ७० किलोमीटर अंतरावरील कार्यरत वनक्षेत्रपाल यांना समकक्ष पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला असून त्यांनीही बिलोलीचाच कित्ता गिरवित येथे कर्तव्याची पायमल्ली केल्याचे स्पष्ट दिसून येत असतांनाही पदावरून पायउतार करण्यासह अनेक प्रकरणांत त्यांच्यावर थेट कारवाई दूरच त्याउलट वरिष्ठांकडून मेहरनजर ठेवली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार,नांदेडच्या विभागीय वन अधिकारी कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी/वनक्षेत्रपाल (विशेष कार्य) या रिक्त पदावर वरिष्ठांकडून अन्य अधिकाऱ्यांची पदस्थापना होईस्तोवर स्थानिक वा लगतच्या तालुक्यातील समकक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी/वनक्षेत्रपालाऐवजी जवळपास ७० किलोमीटर अंतरावरील बिलोलीच्या वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे यांना सदरच्या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार/पदभार देऊन स्थानिक वरिष्ठांकडून जणू त्यांची सोय करण्यात आल्याचे समजते. माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ नुसार सदरील पद या कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करण्यांत आलेले असून या विभागाच्या अखत्यारितील सर्वच कार्यालयांत कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी/वनक्षेत्रपाल यांनाच त्यांच्या कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी म्हणून पदनिर्देशित करण्यांत आलेले आहे.
वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे यांच्याकडून त्या कार्यरत असलेल्या बिलोलीसह अतिरिक्त कार्यभारातील नांदेडच्या वरिष्ठ कार्यालयात मिळालेल्या सदर पदाचे योग्यतेने कर्तव्य बजावण्याची अपेक्षा होती.परंतू,त्यांच्याकडून जणू आपल्या कर्तव्याची सातत्याने पायमल्ली केली जात आहे त्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने त्या थेट नांदेडातच वास्तव्यास राहून बिलोलीची मूळ पदस्थापना असलेले कार्यालय सांभाळतात त्यांच्या याच कृतीचा अवलंब त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने त्यांचे बिलोली येथिल कार्यालय थेट बारमाही रोजंदारी कामगारच सांभाळत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास यापूर्वी आणून देण्यात आल्यानंतरही दोषींविरुद्ध कारवाई होत नाही हे विशेष.
वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे यांच्याकडून माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ च्या कलम ४ नुसार त्यांनी कार्यरत असलेल्या कार्यालयांची स्वयंप्रेरणेने निर्धारित केलेली माहिती प्रकट करण्यासह अर्जदारांना मागीतलेली माहिती पुरविणे तसेच,अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणे दूरच बिलोलीसह नांदेडच्या अतिरिक्त कार्यभार असलेल्या कार्यालयातही अद्याप पदनिर्देशित जनमाहिती अधिकारी,सहाय्यक जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नांव, कार्यालयीन पत्ता त्यांच्या पदनामासह उल्लेख असलेले फलक वेळोवेळीच्या बदलांसह कार्यालयाच्या प्रथम दर्शनी लावणे बंधनकारक असतांना स्वतः वा वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून लावल्याचे दिसून येत नाही.सोबतच,उंटावरुन शेळ्या हाकीत बिलोलीचा कार्यभार सांभाळण्याची स्वतःची कार्यपद्धती किमान नांदेडात वास्तव्यास असल्याने दूर सारण्याची गरज असतांनाही तक्रारकर्ते,अभ्यागत असो वा अर्जदारच नव्हे तर,प्रथम अपिलीय सुनावणीवेळीही त्यांची दांडी असतांना सातत्याने वरिष्ठांकडून त्यांची पाठराखण केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान मुख्यालयाचे वावडे असलेले या विभागातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी उंटावरुन शेळ्या हाकीत नांदेड, लगतचे वा रहिवाशी असलेल्या गांव,शहरातूनच आपला कारभार हाकतात त्यातच, क्षेत्रीय कामे-ऑनलाईन बैठका आदी अनेक बाबींच्या कारणास्तव त्यांना जणू आपल्या कार्यालयाचे अनेक दिवस दर्शनही नसते मात्र तरिही जिल्ह्यातील सर्वच परिक्षेत्रात मंजूर कामे आणि त्यावरिल खर्च पहाता बहुतांश कामे पूर्णत्वास असल्याने ती निश्चितच कागदोपत्री अलबेल असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येते. बहुतांश क्षेत्रिय कामे व त्यावरिल खर्च कागदोपत्री पूर्णत्वास असलातरिही त्या खर्च व शिल्लकीतील स्थानिक व वरिष्ठांची वाटणी त्याचबरोबर, कार्यक्षेत्रातील प्रत्येक बाबींच्या आर्थिक तडजोडीमूळे या विभागाचा मूळ उद्देश असलेली रोपवने,वृक्षलागवड,संगोपन यातून पर्यावरणसमृद्धी वा पर्यावरणादृष्टीने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास नक्कीच कोसो दूर आहे यात तिळमात्र शंका नाही.
सुधारणा दूरच परिस्थिती जैसे थे !
महाराष्ट्र विधीमंडळाच्या गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथिल सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यात पहिल्यांदाच तत्कालीन विभागीय वन अधिकारी दर्जाचे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक आशिष हिवरे तसेच, भोकरपाठोपाठ हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांनाही निलंबनाला सामोरे जावे लागल्याने रिक्त असलेल्या सहाय्यक वनसंरक्षक पदावर वनविभागातून या विभागात बदलीवर आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी/वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांना अतिरिक्त पदभार देण्यात आलेला असून विभागीय वन अधिकारी या रिक्त पदावर संदिप चव्हाण यांना पदस्थापना देण्यात आलेली आहे.या दोन्ही पदावर नविन अधिकाऱ्यांची वर्णी लागल्याने या विभागात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात असतांनाच सुधारणा दूरच परिस्थिती जैसे थे असल्याच्या प्रतिक्रिया वनप्रेमींतून व्यक्त होत आहेत.