नांदेड| सूपर वॉरियर्स यांच्या मतदान केंद्रांवर 51 टक्के पेक्षा अधिक मते मिळतील त्यांनाच खासदार, आमदार व नगरसेवकांचे एबी फॉर्म मिळतील,असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर व भोकर विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी गुरुग्रंथ भवन येथे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संवाद साधला.
महावीजय 2024 पुर्ण करावयाचा आहे. 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यात महाराष्ट्रातील 48 पैकी 45 असतील. 45 प्लस खासदार निवडून आणावयाचे आहे.उर्वरित तीन मध्ये नांदेड नाही, असेही बावनकुळे म्हणाले. येत्या 5 जानेवारी 2024 पर्यंत 48 लोकसभा मतदारसंघ पिंजून पुर्ण होतील. संघटनेत काम करणाऱ्यांना पक्ष कधीही निवड करेल , हे भाजपातच होऊ शकते. असे म्हणत त्यांनी नुकत्याच तीन राज्यांतील मुख्यमंत्री निवड निदर्शनास आणून दिली.
भोकर विधानसभा मतदारसंघाच्या वॉरियर्सच्या यादीतील 32 जणांनी फोन उचलला, बाकीच्यांनी उचलला नाही. फोन न उचलने उचित नाही. पक्षाचा मालक कोणी नाही. सोशल मीडियावर नांदेडचे सूपर वॉरियर्स सक्रिय नसल्याची खंत व्यक्त केली.पक्षाचा पदाधिकारी सूपर वॉरियर्स मधूनच झाला पाहिजे , असे बावनकुळे म्हणाले. नांदेड विमानतळावर स्वागत करण्यासाठी अनेक नेते येतात. त्यापेक्षा पक्षातील कमांडरचा सत्कार करा,असा सल्ला देत विमानतळावर येणाऱ्या नेत्यांना बावनकुळे यांनी टोला लगावला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका कोणत्याही नेत्याला नव्हती. फक्त तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. विधानसभा व कोर्टात टिकले. पण नतभ्रष्ठ तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा आरक्षण घालविले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उध्दव ठाकरे व अशोक चव्हाण असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. भाजपाचा दुप्पटा घालण्यासाठी अनेकजण तयार आहेत. सुर्यकांताताई नाव सांगु का ? असे म्हणत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वेळप्रसंगी नाव सांगू , असे सूचक विधान केले.
पदे देण्यावरुन जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष यांना उद्देशून पदे द्या, मागेल त्याला पदे द्या. पण 51 टक्के मतदान न घेतले तर पद काढून घेण्याचा सल्ला ही बावनकुळे यांनी दिला. मुखेड येथील बैठकीतील तीनही तालुक्यांतून मताधिक्य मिळाले पण नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर व भोकर विधानसभा मतदारसंघातुन कमी मते मिळाल्याची खंत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघ मोठ्या मताधिक्याने जिंकायचे आहे, असेही ते म्हणाले.
सूपर वॉरियर्सच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे भाजपचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी सांगितले. महानगरच्या वतीने सर्व आंदोलन केले. पक्षाने दखल घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.लोकसभा निवडणुकीत यश मिळेल. महापालिकेवर कमळ फुलेल.असे आश्वासन देत कंदकुर्ते यांनी नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर व लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कडे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल खांडिल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.