लक्ष्मी मुर्त्या, फोटो व पावल’ आकाश दिव्यांनी बाजारपेठ सजली; विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी
हिमायतनगर,अनिल मादसवार। दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे लक्ष्मी मूर्ती, पावले, हळद- कुंकू, दिवे, वही -खाते, महालक्ष्मी फोटो यासह विविध कलाकृतीतून साकारलेली आकर्षक अशी आकाश दिव्यांसह इतर साहित्य बाजारात विक्रीस दाखल झाले आहेत. दीपावली पर्वाला वसुबारस पूजनाने सुरुवात झाली असून, आज धनत्रयोदशीच्या दिवशी महिलांनी वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. सायंकाळच्या वेळेस प्रकाश झोतात विविध प्रकारचे दिवे व्यापाऱ्यांनी लावून सजावट केल्याने परिसरातील बाजारपेठ आकाश दिव्यांनी गजबजून गेली आहेत.
दिवाळीची खरी सुरवात वसुबारसपासून होत असली तरी दिवाळीचा मुख्य पर्व लक्ष्मीपूजन असतो. तसेच दीपावली पर्वात आठ दिवस विविध सण साजरे होत असतात. त्यानिमित्ताने लक्ष्मी घरात येत असते. तिचे स्वागत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. त्यानिमित्ताने पुरातन काळापासून लक्ष्मी पावले प्रवेशद्वाराच्या चौकटीवर लावली जात असत. आजही अशा प्रकारची प्राचीन संस्कृती विशेषतः ग्रामीण भागात टिकून आहे.
दीपावलीचे स्वरूप बदलले असले तरी पूर्वी रांगोळीने किंवा रंगाने लक्ष्मी पावले तयार केली जात होती. सध्या बाजारात प्लॅस्टिक, ॲक्रेलिक, लाकडी, कागदी, रेडियम तसेच विविध रत्नांनी तयार केलेले लक्ष्मी पावले आणि धनत्रयोदशी व लक्ष्मी पूजनासाठी वही खाते आणि लक्ष्मीच्या मुर्त्या देखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. अल्प दरात लक्ष्मीची पावले, मुर्त्या व दिवाळीच्या सजावटीसह पूजेसाठी लागणारे साहित्य मिळत असल्याने नागरिकांचा कल त्यांच्या खरेदीकडे अधिक आहे.
त्याचप्रमाणे शुभलाभ अक्षर, उंबरपट्टी, दारपट्टी, हळद कुंकू पावले, लटकन, तोरण, गाय- वासरू जोडी, रांगोळी, स्टिकर, दिवे, आकाश कंदील यासह इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठ गजबजून गेली आहे. राज्यातील मुबई ,पुणे , नाशिक यासह परराज्यातून आणलेले साहित्य खरेदीसाठी मोठया प्रमाणात दुकानात व बाहेर गर्दी दिसून येत आहे. तर अनेक प्रतिष्ठानानी रोषणाई करून विविध वस्तूची आकर्षक सजावट केली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने महिला वर्गाकडून या वस्तू खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. तर रेडिमेड कापड दुकानासह ,किराणा दुकान, इलेक्ट्रॉनिक, स्वीट होम, यासह अनेक ठिकाणी परिवारातील सदस्य यांच्यासह महिला, मुले, मुली दिवाळी सणाच्या निमित्ताने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली असल्याने जिकडे तिकडं तोबा गर्दी दिसून येत आहे.