जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रात्यक्षिकाचे धडे
नांदेड| जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्त्व सांगून योग्य प्रकारे हात कसे धुवावेत याचे जणू प्रात्यक्षिकच दाखवून स्वच्छतेच्या सहा संदेशांतर्गत विद्यार्थ्यांना धडे दिले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हात धुणे प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार, कविता गोडबोले, हैदर शेख, मनिषा गच्चे, आनंद गोडबोले यांची उपस्थिती होती.
जागतिक हात धुवा दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक संतोष घटकार यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर इयत्तानिहाय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दोन्ही हात धुण्याचे प्रशिक्षण घेतले आणि प्रात्यक्षिक करून दाखविले. दैनंदिन जीवनात जेवणापूर्वी व शौचानंतर हात धुणे आरोग्याच्या दृष्टीने कसे लाभदायक आहे तसेच तसे न केल्यास काय दुष्परिणाम होतात याची माहिती गुरुजनांनी दिली. यावेळी स्वच्छतेचे सहा संदेश विद्यार्थ्यांना सांगितले.