नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नियमित वीज बिलाचा भरणा केल्यानंतरही नायगाव तालुक्यातील मांडणी येथील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा ३ महिण्यापासून सुरळीत करण्यात आला नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत तातडीने डीपी बसवा असे सांगितले. त्यामुळे तात्काळ मांडणीत डीपी बसविल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नायगाव तालुक्यातील मांडणी हे गाव टोकाला असल्याने या भागाकडे शासनाचे नेहमी दुर्लक्ष असते. त्यातच विज वितरण कंपनीने देखील शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले. मांडणीच्या एका डिपी वरुन दहा शेतकऱ्यांच्या हातपंपाला विज पुरवठा होतो. सदर डीपी जूनमध्ये नादुरुस्त झाला. हा डीपी बदलून मिळावा म्हणून अनेकवेळा शेतकऱ्यांनी महावितरणच्या घुंगराळा व देगलूरच्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करत होते. नियमितपणे बिल भरणा केल्यानंतरही पुन्हा रक्कम
भरण्यात यावी तरच डीपी येईल असा पवित्रा देगलूरच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता.
त्यामुळे मांडणीच्या शेतकऱ्यांनी तातडीने डीपी मिळण्यासाठी काही रक्कमही भरली तरीही डीपी बसवण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे मांडणीच्या शेतकऱ्यांनी नायगाव विधानसभेचे युवा नेते प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांची भेट घेऊन अडचणी सांगितले. शेतक-यांची आडचण लक्षात घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्याशी बोलून महावितरणने मांडणीत डीपी बसविली.
या कामी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष माणिक चव्हाण यांनी शेतकऱ्यांसोबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन पाठपुराव केला. नायगावचे उपअभियंता तिवारी यांनी मांडणी गावचा डी. पी. बसवून शेतकऱ्यांना वीज पुरवठा दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.