सुखकर्ता…दुखहर्त्या बाप्पाला भावपूर्ण निरोप…. पुष्पवृष्टी, टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये निघाली मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| गणपती स्थापनेच्या १० व्या दिवशी अनंत चर्तुदशी दि.२८ रोजी गुरुवार आल्याने दुपारी २ वाजता गाजत निघालेली श्री गणपती बाप्पाची मिरवणूक रात्री ०१ वाजेपर्यंत सुरूच होती. येथील इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिराजवळील श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत दुपारी श्री परमेश्वर मंदिरातील मनाच्या पालखी गणपतीसह शहरातील अनेक गणपतीचे विसर्जन तूच सुखकर्ता… तूच दुखहर्ता… अवघ्या दिनाच्या नाता… बाप्पा मोरया रे… गणपती अपने गांव चाले… कैसे हमको चैन पडे… निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी…. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी… गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… अश्या धार्मिक गीतांच्या उत्साहपूर्ण वातावरणात विघ्णहर्ता गणपती बाप्पाला जड अंतकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
शुक्रवारी दहाव्या दिवशी जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील व वडाचा मानाच्या गणेशाची पालखी मिरवणूक टाळ – मृदंगाच्या गजरात व ढोल – ताश्याच्या वाद्यात सकाळी ११ वाजता काढण्यात आली. सदर मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने होत बजरंग चौकातून पळसपूर रस्त्यावर येऊन शहरापासून हाकेच्या अनंतरवर असलेल्या श्री कनकेश्वर तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आहे. त्यानंतर शहरातील प्रथम क्रमांकाच्या व्यापारी गणेश मंडळापाठोपाठ सर्वच गणेश मंडळाच्या युवकांनी भजनी मंडळींच्या दिंडीसह पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणूक काढली होती.
अनंत चतुर्थी निमित्त सर्वात प्रथम येथील वरद विनायक मंदिरातील गणेशाचे विसर्जन, त्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील पालखी गणेशाचे आणि त्यानंतर लहान बालकांच्या बाप्पाचे ग घरघुती गणपतीचे विसर्जन आनंदाने करण्यात आले. शहरात स्थापन करण्यात आलेल्या गणपतीची मुख्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघाली यावेळी गणरायाला निरोप देऊन शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारो महिला, पुरुष व बालभक्त रस्त्याच्या कडेला उपस्थित झाले होते. शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने धुधडाक्यात गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे गणपती राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी होती. इमारतींच्या खिडक्या, छतावर दाटीवाटीने उभे राहून भक्तांनी बाप्पाचे अखेरचे दर्शन घेतले. परंपरेनुसार निवडक ठिकाणच्या भक्तांनी गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी केली.
आज गणेश विसर्जन निमित्ताने शहरातील विसर्जन रस्त्यात अनेक ठिकाणच्या खड्डे बुजविले गेले नसल्याने खड्डे जैसेथेच होते. या प्रकारामुळे मानाच्या श्री परमेश्वर मंदिरातील गणपतीच्या पालखी मिरवणुकीत सामील भक्तांना अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाची प्रचिती दिसून आली आहे. एकूणच शांतता कमिटीची बैठकीत दिलेली आश्वासनावर अंमलबजावणी झाली नसल्याने गणेशभक्तातून संताप व्यक्त केला जात आहे. काही गणेशभक्तांनी तर थेट प्रभारी अधिकाऱ्यास दूरधवनीवरून खरीखोटी सुनावली आहे. उत्सवाच्या काळात दुर्लक्षितपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करून नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी उपलब्ध करून शहरातील नागरी समस्या सोडवाव्यात अशी मागणी होते आहे.