
नांदेड। विविध कारणांनी रखडलेली प्राथमिक शाळांतील पात्र शाळांसाठी लागू असलेली मोफत गणवेश वाटप योजना कार्यान्वित करण्यात आली असून जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अखेर मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने मिळालेल्या दोन गणवेशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले असल्याचे दिसून आले.
यापूर्वी एकच गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. मात्र शाळेतील सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, सरपंच कमलताई शिखरे, ग्राम पंचायत सदस्या सिंधुताई पांचाळ, सहशिक्षक संतोष घटकार, माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे, अंगणवाडी सेविका इंदिरा पांचाळ, माधवदादा गोडबोले, हैदर शेख, हरिदास पांचाळ, बालाजी पांचाळ आदींची उपस्थिती होती.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत शालेय गणवेश अनुदान योजना कार्यान्वित करुन अनुसूचित जाती, जमाती, सर्व मुली आणि दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील मुलांना प्रत्येकी मोफत दोन गणवेश देण्यात येत होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा शाखेने ओबीसींसह खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा अशी मागणी केली होती. या अनुषंगाने शासन निर्णयात बदल होऊन सर्वांनाच गणवेश देण्याचा निर्णय झाला.
परंतु शासनाच्या पीएफएमएस प्रणालीमुळे दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना मिळण्यास विलंब झाला. जवळा दे. येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नाने सर्व त्रुटींची पुर्तता करुन दुसऱ्यांदा प्रस्ताव दिल्यानंतर उशिराने शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. याच योजनेतील बुट आणि साॅक्स अजून अप्राप्त असून पुढील टप्प्यात ते मिळणार असल्याचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी यावेळी सांगितले.
