उमरी/नांदेड। जिल्ह्यातील उमरी शहराजवळील गोरठा रस्त्यावर पेहलवान धाब्यावर पोलिसांनी काल दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकून आठ लाख ४० हजार ८५० रुपयांच्या मुद्देमालासह ४७ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीवरून दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे , उपनिरीक्षक पंतोजी, पोलीस जमादार गेडाम, पोलीस कॉन्स्टेबल घेवारे , पवार, सुपारे, गंदपवार, इंजपवार आदी पोलिसांच्या पथकाने ही धाड टाकली.
सदरील पेहलवान ढाब्यावर जुगार चालत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी तीन दुचाकीसह ४७ जणांना पोलिसांनी अटक केली. यावेळी ७ लाख २२ हजार ८५० रुपयांची रोख रक्कम व तीन दुचाकीसह एकूण ८ लाख ४० हजार ८५० रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.