श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहरे। माहूर तालुक्यातील काळी व केरोळी रेती डेपो मध्ये अटी व शर्तीचा भंग करून रेती वितरण मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात घेत असल्याने सदर रेती डेपोची चौकशी करून रेती डेपो धारकाविरुद्ध कारवाई करून गरजू नागरिकांना योग्य दरात रेती उपलब्ध करून देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर यांनी दि.१८ जून रोजी तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, माहूर तालुक्यात केरोळी व कोळी बे. येथे दि.६ जून रोजी रेती डेपो सुरु करण्यात आले असून कोळी, केरोळी येथील रेती डेपोमध्ये राजरोसपणे अटी व शर्तीचा भंग करण्यात येत असल्याचे नमूद असून डेपोधारकाने सदर डेपोमध्ये दोन प्रकारच्या रेतीचा साठा केला असून विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती मोफत देण्याकरीता मोठ्या प्रमाणात रोडा मिश्रित निकृष्ठ दर्जाची रेती देण्यात येत असल्याचे नमूद आहे.तसेच घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून २०० रु.ब्रास प्रमाणे रॉयल्टी आकारण्याचे शासनाचे निर्देश असतांना डेपो धारकाकडून मनमानीपणे ५०० ते १ हजार रुपये ब्रास उकळून प्रचंड रोडा मिश्रित व निकृष्ट दर्जाची रेती देऊन आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप घोडेकर यांनी आपल्या निवेदनातून केला आहे.
तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या नावाने ऑनलाईन बुकिंग करून प्रत्यक्ष बुकिंग धारकांना रेती न देता अवैध मार्गाने ७ हजार ते ८ हजार रुपये दराने उच्च दर्जाची रेती कंञाटदार व इतर ग्राहकांना रेती पार्सल करण्यात येत आहे. तसेच एखाद्या घरकुल लाभार्थ्याने स्वताच्या वाहनाने घेऊन गेल्यास त्यांना रेती डेपो धारकांच्या हितसंबंधीत लोकांच्या वाहनानेच रेती वाहतूक करण्यास भाग पाडत घरकुलधारक लाभार्थ्यांची अडवणूक करण्यात येत आहे.एवढेच नाही तर डेपोच्या अटी व शर्तींचे राजरोसपणे उल्लंघन होत असल्याचा प्रकार माहूर तालुक्यातील कोळी व केरोळी ता. माहूर रेती डेपोवर होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे .
महसूल विभागाचे उच्चस्तरीय पथकामार्फत कोळी व केरोळी ता. माहूर रेती डेपोला सरप्राईज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व सदर रेती डेपो धारकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच सदर रेती डेपोवर नियंत्रण ठेवण्याकरिता कायमस्वरूपी महसूल अधिकारी नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी घोडेकर यांनी केली आहे.सदरील निवेदनाच्या प्रति महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट यांना दिले आहे.या गंबीर प्रकरणाकडे संबधीत प्रशासन व सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेतील याकडे माहूर तालुक्यासह किनवट तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या आदेशावरून माहूर तालुक्यातील लांजी येथील मंजूर डेपो मधून २८९ लाभार्थ्यांना ७३० ब्रास लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करण्यात आले,हे खरे असले तरी डेपो धारकाकडून मनमानीपणे ५०० ते १ हजार रुपये ब्रास उकळून वाटप केलेली वाळु प्रचंड रोडा मिश्रित व निकृष्ट दर्जाची देण्यात आल्याची ओरढ तालुक्यातील गोर गरीब घरकुल लाभार्थ्याकडून होत असून त्याचे परिणाम सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे.ऐवढेच नव्हे तर चांगल्या प्रतिची वाळु ७००० रुपये दराणे मिळेल अशी जाहिरात देखील माध्यमातून होत आहे.हे विशेष बाब आहे.