उस्माननगर, माणिक भिसे।तालुका कृषी अधिकारी कार्यालय व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या वतीने मंगळवारी, २१ मे रोजी सकाळी ९ वाजता मौजे उस्माननगर (ता. कंधार) येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीला येथील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे घरचे बियाणे वापरणे, इतर खरीपातील सर्व पिकांच्या विविध वाणां विषयी माहिती दिली. तसेच बियाणे उगवण क्षमता तपासणी करणे, बीजप्रक्रिया करणे, बीज प्रक्रियेचे महत्व, येत्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर रुंद सरी वरंबापद्धत या तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी करणे, मृदा आरोग्य तपासून खताचे नियोजन करणे, मृद नमुना काढणे, येत्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच शेतकऱ्यांनी किमान १५ टक्के क्षेत्रावर फळबाग योजनेमार्फत लागवड करून लाभ घ्यावा असे आवाहनही केले. महाडीबीटी प्रणाली मार्फत राबवले जाणाऱ्या विविध योजना विषयी माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीनची उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी विठ्ठल गित्ते, बारुळचे मंडळ कृषि अधिकारी सुनिल राठोड, कृषि सहाय्यक सोपान उबाळे, शिराढोणचे कृषि सहाय्यक नितीन इंगेवाड, संजय वारकड, पप्पु काळम व गावातील इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचलन उस्माननगरचे कृषी सहाय्यक सोपान उबाळे यांनी केले. तर आभार कृषी सहाय्यक नितीन इंगेवाड यांनी मानले.