अबब!! ८२ वर्षाच्या निलाबाई नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे अजूनही शिपाई पदावर
नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेच्या नरसिंह विद्यामंदिर शाळेत निलाबाई ८२ वर्षाच्या झाल्या तरी शिपाई पदावर अजूनही विराजमान राहून शासनाकडून वेतन घेत आहेत. सेवानिवृत्तीच्या वयापेक्षा २० वर्ष जास्तीचे नौकरी करू देण्यास शिक्षण विभागाचे, संस्थेचे व मुख्याध्यापकांचे सहकार्य असावे असे दिसते. पण ही बाब नुकतीच उजेडात आल्यामुळे सदरील संस्थेचे अजीव सदस्य सखाराम कुलकर्णी यांनी निलाबाई यांना सात दिवसात बडतर्फ करून त्यांचे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नांदेड सह शिक्षण प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येते. नुकतेच निलाबाई शिंदे यांचे ८२ वर्षे झाले तरी शासनाच्या सेवेत राहून शासनाकडून वेतन घेत आहेत .ही बाब उजेडात आली. या संस्थेचे नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे काही दिवसापूर्वी शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार झालेला उघड होऊन चव्हाट्यावर आला.
नरसिंह विद्यामंदिर नांदेड चा महानगरपालिकेचा सर्व कर मिळून पाच ते सहा कोटी थकीत आहे. त्यांच्या वसुलीचीही जप्ती शाळेवर आली होती. तर आता निलाबाईचे हे प्रकरण उजेडात आले. नरसिंह विद्यामंदिर उमरदरी ता. मुखेड शाळेत शिपाई पदावर निलाबाई शिंदे या नावाने त्या कार्यरत आहेत. तर जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेत निलाबाई जाधव या सासरच्या नावाने त्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. सरचिटणीस या मुख्य पदावर संस्थेत असल्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती देण्याची हिंमत कोनात आहे. हा प्रश्न समोर येतो .तर शिक्षण विभाग या वाढीव वयाकडे दुर्लक्ष करते असे दिसते. म्हणून निलाबाई शिंदे (जाधव) या सेवानिवृत्तीच्या वयापेक्षा वीस वर्ष जास्त झाले तरी शिपाई पदावर राहून शासनाला लुबाडत आहेत.
आधार कार्ड नुसार त्यांचा जन्म १९४२ चा आहे व त्या शिपाई म्हणून कार्यरत आहे हा जवाब त्यांनी धर्मादाय उप आयुक्त नांदेड येथे दिला. न्यायालयात जवाब दिला असल्यामुळे तो सत्यच असणार ,यात शंका नाही. ही बाब संस्थेचे अजीव सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण संचालक पुणे यांचेकडे निलाबाई यांना बडतर्फ करून वीस वर्ष घेतलेले जास्तीचे वेतन वसूल करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदना द्वारे केली. या मागणी व पुराव्यानुसार शिक्षणाधिकारी काय निर्णय घेतात व काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.