नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी-घारापुर -खडकी -सिरपल्ली कौठा -या गावातील नदी पात्रातुन व नाल्यातुन ओढ्यातुन दिवस व रात्रीला अवैध रेती उपसा जोमात सुरू आहे. सदरील उत्खनन तात्काळ थांबवुन उत्खनन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.
या संदर्भात लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजू गायकवाड यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नादिसह गावाजवळ असलेल्या नाल्यातून मोठया प्रमाणावर रेतीचे उत्खनन केले जाते आहे. हा प्रकार महसूलचे अधिकारी कर्मचारी यांना माहिती आहे, मात्र मूग गिळून गप्प असल्याने वाळूदादांचे फावले जात आहे. आता तर या धंद्यात काही राजकिय नेत्यांचे समर्थक व पदाधिकारी हे धंदे करत आहेत. त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांना मैनेज करून, रेतीचा विनापरवाना उत्खनन करून वाहतूक करत आहेत.
ही बाब लक्षात घेता, हिमायतनगर तालुक्यात होत असलेल्या रेती उत्खनन थांबले नाही तर येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असे राजु गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.