नांदेड। भाजप महानगर नांदेड व कलामंदिर ट्रस्ट तर्फे भारतामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकातले भारताचे सर्व सामने मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार असून रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने दाखविण्याचे हे विक्रमी १५ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.*
रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा रोमांचकारी सामना होणार आहे.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
कलामंदिर ट्रस्टचे अध्यक्षा तथा भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. शितल भालके यांनी कलामंदिर मधील शेड सामने दाखवण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. १९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात.आतापर्यंत पन्नास षटकांचे ६ वेळा आणि ट्वेंटी २० विश्वचषकाचे ८ वेळा दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले.२००७ आणि २०११ मध्ये भारताने एक दिवसीय विश्वकप जिंकल्यानंतर तसेच ट्वेंटी २० विश्वचषक २००७ मध्ये हिंदुस्थानने जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते.
यावर्षीच्या विश्वचषकात भारतीय संघ जिंकेल असा विश्वास जगभरातील सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.११ ऑक्टोबर ,१४ ऑक्टोबर ,१९ ऑक्टोबर, २२ऑक्टोबर, २९ऑक्टोबर,२ नोव्हेंबर ,५ नोव्हेंबर ,१२ नोव्हेंबर रोजी भारताचे सामने आहेत.१५ आणि १६ नोव्हेंबरलाउपांत्य फेरी तसेच १९ नोव्हेंबर ला अंतिम फेरीचा सामना होणार आहे. हे सर्व सामने दुपारी एक वाजता सुरू होणार आहेत.कलामंदिर मधील शेड मध्ये आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी केले आहे.