सरकारने दिलेलं फसवं आरक्षण मराठ्यांना मान्य नाही… -सकल मराठा समाज, नांदेड
नांदेड। आज घेतलेल्या विशेष अधिवेशनात सरकार ने मराठा समाजाला असंविधानिक आणि घटनाबाह्य 10% आरक्षण देणं म्हणजे सपशेल मराठ्यांची केलेली फसवणूक आहे असं प्रतिपादन मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी आज घडलेल्या घडामोडी वरून केले आहे.
मराठा समाजानी जरांगे पाटील यांच्या माध्यमातून उभं केलेल्या आंदोलनाची मागणी ही ओबीसी प्रवर्गातून असताना सरकारने मात्र घटनाबाह्य आणि 50% च्या वरचं आरक्षण देऊ केलेलं आहे. इंद्रा सहानी च्या खटल्या नुसार 50% च्या वर दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीत टिकू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने 5 में 2021 रोजी दिलेल्या निकालात सांगुन सुद्धा सरकारने मात्र वेळ मारून नेण्यासाठी जुन्याच आरक्षणाला नव्याने देण्याचा उद्योग केला असुन 27 जानेवारी 2024 रोजी उधळलेल्या गुलालाचा सरळ सरळ अपमान केला आहे हे मात्र आज सिद्ध झाले आहे.
सरकारने केलेला प्रयोग हा त्यांना परवडणारा नसुन येणाऱ्या काळात मराठ्यांचे खुप मोठे आंदोलन उभे राहिल्या शिवाय राहणार नाही. उद्या दि.21 रोजी दुपारी 12 वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा कळवणार आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा तमाम मराठा समाजाला मान्य असुन, सरकार विरोधात दंड थोपटण्यासाठी मराठे सज्ज आहेत असा ईशारा सुद्धा श्याम पाटील वडजे यांनी दिला.