महाराष्ट्र बंदच्या हाकेला हिमायतनगर शहरातून १०० टक्के प्रतिसाद
हिमायतनगर,परमेश्वर काळे| मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदच्या हाकेला हिमायतनगर शहरातून पाठिंबा मिळाला आहे. बुधवारी आठवडी बाजार असल्याने हिमायतनगर शहरातील सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे गुरुवारी सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली होती.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला तात्काळ मंजुरी द्यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्या समर्थनार्थ हिमायतनगर बंडाला सर्व समाजाने पाठिंबा दिला असून, बंदमध्ये सहभागी होऊन सकाळी ९ वाजल्यापासून दुकाने बंद ठेवून सहकार्य केले आहे. दुपारी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवीण्यात आले व सदर प्रकरणावर व चालू प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला न्याय देण्याची भावना व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रात बंदच्या हाकेला प्रतीसाद देत त्यांच्या उपोषणाला आधार देण्यासाठी हिमायतनगरची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आजच्या बंद दरम्यान मराठा समाजाच्या तीव्र भावना थेट सरकार पर्यंत पोचवाव्यात. असे आंदोलक मराठा समाजाचे मत असून, वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा…! अशा घोषणा देण्यात आल्या. बंद दरम्यान हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावरील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने सायंकाळी ५ ते ६ या दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. याबद्दल सकल मराठा समाजच्या वतीने व्यापारी वर्गांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी मराठा सेवक रामभाऊ सूर्यवंशी, गोविंद शिंदे, श्रीकांत सूर्यवंशी, प्रमोद राठोड, लखन जाधव यांच्यासह सकल मराठा समाज बांधव व इतर समाजाचे नागरिक उपस्थित होते.