नांदेड येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील विविध प्रांतातील सांस्कृतीचे आदान प्रदान व्हावे. तसेच स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी नांदेड शहरात दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी विविध मैदानी खेळ पोलीस कवायत मैदान नांदेड येथे घेतले जाणार आहेत. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यामध्ये खो-खो, कबड्डी, लेझीम, कुस्ती, मल्लखांब, आट्यापाट्या, घुंगरूकाठी, लाठीकाठी, रस्सीखेच, गदका, लगोरी इत्यादी विविध खेळाच्या स्पर्धा होणार आहेत.
दिनांक 16 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथे लोककला महोत्सवाचे आयोयजन करण्यात आले आहे. यामध्ये पोवाडा, भारुड, गोंधळ, वाघ्या मुरळी, भजन, लोकसंस्कृती तसेच लुप्त होत चाललेल्या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नवा मोढा बाजार समिती मैदानात लोक संगीताचा कार्यक्रम होईल. यामध्ये शास्त्रीय गायन, लोकगीत, जात्यावरच्या ओव्या, भुलैया, वादनाचे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत. तसेच 18 फेब्रुवारी रोजी लोकनृत्याचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शास्त्रीय नृत्य, आदिवासी नृत्य, लोकोत्सव नृत्य, लावणी, कोळी नृत्य, धनगरी नृत्य व महाराष्ट्र परंपरेवर आधारित समूह नृत्य होणार आहे. यामध्ये स्थानिक कलाकारासह महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. तरी नागरिकांनी या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा येथे 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान वस्त्र संस्कृती प्रदर्शनी, हस्तकला वस्तू प्रदर्शनी व बचत बचतगटांनी तयार केलेल्या हस्तकला व र्इतर वस्तू प्रदर्शन व विक्री तसेच पर्यटन विषयक प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आय.टी.आय. कॉलेज येथे शिवरचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा घेतली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहणार आहे. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील होळी परिसरातील नंदगिरी किल्ला येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध घटना, ठिकाण, निसर्ग, पर्यटन इत्यादी बाबींवर छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून छायाचित्रकार व यामध्ये रुची ठेवणारे कलावंत व नागरिकही प्रदर्शनात आपले छायाचित्रे ठेवू शकतील. तरी या महासांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच खुल्या स्पर्धेत मोठयो संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
नांदेड येथे होणारा महासंस्कृती महोत्सव म्हणजे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक कलाकार व लोक कलावंतांना अनुभवण्याची व त्यांच्या कलेला कलासक्तपणे दाद देण्याची एक सांस्कृतिक परवणीच आहे. सर्व नागरिकांनी जाणकार कलाकारांचे कला प्रदर्शन पाहण्यासाठी व स्थानिक संस्कृतीला नव्याने उजाळा देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवात उपस्थित राहून कलाकारांच्या कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.