नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बालगृहामध्ये असलेल्या अनाथ व निराधार बालकांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या तरतुदीनूसार प्रतिपालकत्व योजनेंतर्गत जी बालके कुटुंबापासून वंचीत आहेत, अशा बालकांना कुटुंबाचे वातावरण, प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. अशा अनाथ बालकांचे प्रतिपालकत्व स्विकारण्यास समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे स्वनाथ फाऊंडेशन व महिला बाल विकास विभाग यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी महिला व बालकांसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. तर स्वनाथ फाउंडेशनच्या संस्थापक व कार्यकारी विश्वस्त श्रीम. श्रेया भारतीय यांनी प्रतिपालकत्व योजनेविषयी चर्चा व स्वनाथ फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. या बैठकीमध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी प्रतिपालकत्व योजनेविषयी माहिती व मार्गदर्शन केले.
यावेळी कुटुंबातच बालकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, त्यास आई-वडिलांचे प्रेम मिळते. त्याचा तो अधिकार आहे, ज्यामुळे बालकाच्या सर्वांगीण विकास होतो. यामुळे अनाथ बालकांना प्रतिपालकत्व योजनेंतर्गत इच्छूक कुटुंबात पुन:स्थापीत करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी व्यक्त केले.
प्रतिपालकत्व स्विकारण्यास इच्छूकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांच्याशी संपर्क साधल्यास इच्छुक कुटुंबाला कायदेशीररित्या प्रतिपालकत्वाच्या नियम व अटी-शर्तीच्या अधिन राहून मुल दिले जाते, असे मत संदीप फुले यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीस परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, संरक्षण अधिकारी संदीप फुले, कल्पना राठोड, सामाजिक कार्यकर्ता शितल डोंगे, धानाजी कोंडेवाड तसेच वनस्टॉप सेंटरच्या प्रेमला निलेवार प्रशासक व ताई दर्शने केस वर्कर हे उपस्थित होते.